धुळे : टुडे पान २ साठी... अवतीभवती
--
फोटो : 28902
संतोषी पिंपळसेची
राष्ट्रीय स्पर्धेत निवड!
धुळे : महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे चिपळूण (डेरवण जि. रत्नागिरी) येथे झालेल्या ४० व्या जुनियर चॅम्पियनशिप राज्यस्तरीय स्पर्धेत देवपूरस्थित सातपुडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थिनी संतोषी शरद पिंपळसे हिने उल्लेखनीय यश मिळवले. तिने ६०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक जिंकले आणि महाराष्ट्र राज्यात नवीन विक्रम प्रस्थापित केला. या यशाच्या बळावर तिची चेन्नई (तामिळनाडू) येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. प्रशिक्षक प्रमोद पाटील यांचे मार्गदर्शन तिला झाले. खेळाडूच्या या कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर जाधव, विश्वस्त प्रतिमा जाधव, रोहन जाधव, प्राचार्य एच. वाय. पवार आदींनी कौतुक केले.
--
कमलाबाई शाळेत
शिक्षण परिषद
धुळे : महापालिकेतर्फे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमलाबाई शंकरलाल कन्या शाळेत समग्र शिक्षा अभियानांतर्गत समूह तीन, चार व सातची शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. समूहप्रमुख शरद पवार व तुषार वाणी यांनी नियोजन पाहिले. परिषदेत सुलभ क्रांतीअंतर्गत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मोहरे व लेखाधिकारी किशोर जाधव यांनी पोषण आहारावर माहिती दिली. श्री. भामरे यांनी पाठ नियोजन, मेहमूद यांनी शाळा व्यवस्थापन समिती आणि श्री. सिसोदिया यांनी यु- डायस प्रणालीबाबत मार्गदर्शन केले. महेंद्र पवार यांनी उल्हास ॲपची माहिती दिली. विद्या पाटील, स्वाती पाटील व पानपाटील यांनी प्रशस्त ॲपचे प्रात्यक्षिक दाखवले तर हर्षदा येलवे यांनी व्यवसाय मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका छाया नाईक व पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. रवींद्र टाकणे, राहुल गायकवाड यांनी आभार मानले.
--
कबड्डी पंच परीक्षेत
राजमल पवार प्रथम
धुळे : जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मोहाडी उपनगर येथील पिंपळादेवी माध्यमिक विद्यालय येथे जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेला चोवीस परीक्षार्थी उपस्थित होते. पैकी तेवीस परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. यात बेटावदचा राजमल पवार प्रथम तर मोहाडी उपनगरची कल्याणी सूर्यवंशी द्वितीय आली. यशस्वी परीक्षार्थींचे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, आमदार अमरीशभाई पटेल, भूपेशभाई पटेल, असोसिएशनचे सचिव मुजफ्फर अली सय्यद, शिवा पवार, मनोहर चौधरी, डॉ. झाडबुके, ॲड. रवि देसर्डा यांनी कौतुक केले.
--
गोताणेत समिती
अध्यक्षपदी पाटील
धुळे : गोताणे (ता. धुळे) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी भूषण रघुनाथ पाटील यांची निवड करण्यात आली. ग्रामीण भागातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावणे, भौतिक सुविधांचा विकास करणे, विद्यार्थी व पालकांच्या अडीअडचणी सोडवणे, शिक्षक आणि पालकांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी ही समिती कार्यरत असते. गोताणे हे गाव शिक्षण क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिले असून, शैक्षणिक जागृतीवर येथे विशेष भर दिला जातो. भूषण पाटील हे गावातील एक उपक्रमशील व होतकरू पालक आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे शाळेच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
--