धुळे ः टुडे १ साठी
--
ग्राम महसूल अधिकाऱ्यासह
व्यापाराकडे धाडसी घरफोडी
-
दहा लाखांचा ऐवज लंपास
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ५ : शहर व परिसरात बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याचे सत्र सुरूच असून, विंचूर (ता. धुळे) येथे ग्राम महसूल अधिकारी आणि शहरातील पारोळा रोडवरील सिद्धेश्वर हायट्स येथे एका व्यापाऱ्याकडे झालेल्या दोन स्वतंत्र घरफोड्यांत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण ९ लाख ९८ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. याप्रकरणी धुळे तालुका व आझाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
-
विंचूर येथील ग्राम महसूल अधिकारी जिजाबराव संजय बोरसे यांचे घर दोन सप्टेंबरला सायंकाळी सहा ते तीन सप्टेंबरला सकाळी सहादरम्यान बंद होते. ही संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण ४ लाख ८३ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
पाच लाखांची चोरी
दुसऱ्या घटनेत धुळे शहरातील पारोळा रोडवरील सिद्धेश्वर हायट्समधील कापड व्यावसायिक निलेश किसनलाल खंडेलवाल हे दोन सप्टेंबरला दुपारी घराबाहेर कामानिमित्त गेले होते. त्या दरम्यान चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा तसेच बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडले. घरातून ३ लाख ८४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, ८० हजार रुपयांचे चांदीचे दागिने, ५५ हजार रुपये रोख आणि १ हजार २०० रुपयांची एअर बॅग, असा एकूण ५ लाख १५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी आझाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे तपास करीत आहेत.