(पान १ ला मेनला जोड)
-------
फोटो : NSK26H28910
धडगाव : तालुक्यातील निगदी गावाच्या शेतशिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केलेली गांजाची झाडे.
-----------------------
निगदीतून ५६ लाखांचा
११३ किलो गांजा जप्त
नंदुरबार, ता. ६ : वनजमिनीमध्ये मका व भुईमुगाच्या आंतरपिकात गांजाची लागवड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, ५६ लाख रूपये किमतीची गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडगाव तालुक्यातील निगदी गावाच्या शिवारात ही कारवाई केली.
धडगाव तालुक्यात निगदी गावातील शेतशिवारात एका इसमाने त्याच्या शेतात मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणाऱ्या गुंगीकारक ओल्या गांजाची बेकायदेशीररीत्या लागवड केली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी याबाबत पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. पथकाने निगदी गावाच्या शेत शिवारात एका शेताची पाहणी केली असता तेथे ११३ किलो ८५ ग्रॅम वजनाचे ५६ लाख ९२ हजार ५०० रुपये किंमतीची गांजाची झाडे मिळून आली. परशा सन्या वळवी (वय ४०, रा. वाहनीपाडा, निगदी शिवार, ता. धडगाव, जि. नंदुरबार) याने त्याच्या राहत्या घराच्या आजुबाजूला वडिलोपार्जित वनजमिनीमध्ये मक्याच्या व भुईमुगाच्या आंतरपिकात गांजाची झाडांची लागवड केली होती. त्याची जोपासना केल्याचे आढळून आल्याने गांजाची झाडे पथकाने ताब्यात घेतली आहेत. गांजासदृश्य झाडांची लागवड करुन संवर्धन व जोपासना केल्याप्रकरणी वळवी याच्यावर धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पोलिस हवालदार दिनेश चित्ते, स्वप्नील गोसावी, मुकेश तावडे, पोलिस अंमलदार मनोज महाजन, अनिल नागरगोजे, अभय राजपूत, निशीगंध गवळे, हेमंत बारी, विनोद पाटील, रवींद्र अहिरे यांच्या पथकाने कारवाई केली.