(ही बातमी गरजेनुसार विना फोटो घेऊ शकता)
--
NSK26H28851
जळगाव : मोहाडी-शिरसोली रस्त्याची पाहणी करताना आयुक्त आदित्य जिवने. सोबत नगरसेविका वैशाली पाटील, नगरसेवक नितीन सपके व आदी अधिकारी.
.....
गणेशोत्सवापूर्वी मोहाडी-शिरसोली रस्त्याचे खडीकरण
बॅरिकेडिंगचेही निर्देश; ३५ लाखांचा प्रस्ताव महासभेत ठेवण्याची आयुक्तांची सूचना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहाडी रोडवरील गुरु पेट्रोल पंप ते शिरसोली मार्गाची दुरवस्था लक्षात घेता महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांनी शनिवारी या रस्त्याची पाहणी केली. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून खडीकरण करण्यासह गटारीलगत सुरक्षिततेसाठी बॅरिकेडिंग उभारण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
गणेशोत्सवात या मार्गावरून मिरवणुका जातात. विसर्जन मिरवणुकीदरम्यान पाचोरा मार्गावरील वाहतूकही याच रस्त्यावरून वळविली जाते. मात्र, अरुंद आणि खराब झालेल्या रस्त्यालगतची गटार सध्या नाल्यासारखी झाली असून, वाहनचालकांसाठी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी घडलेल्या अपघातांची माहिती नगरसेविका वैशाली पाटील यांनी आयुक्तांना दिली. तसेच रस्ता विकसित झाल्यास परिसरातील सुमारे एक लाख नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. पाहणीवेळी नगरसेवक नितीन सपके, शहर अभियंता योगेश बोरोले, नगररचनाकार अमोल पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.