मेन
फोटो : H28938
गोदाघाटावरील तीर्थे, कुंड अस्तित्वाच्या शोधात
तीसपैकी आठ दहा कुंडांचीच स्थाननिश्चिती; संवर्धन करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : गुरूचा सिंह राशीत प्रवेश झाल्यानंतर नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा केवळ साधुसंतांचे आगमन आणि गोदावरीतील अमृतस्नानापुरता मर्यादित नाही. या पर्वाला नाशिकच्या प्राचीन तीर्थपरंपरेचीही मोठी पार्श्वभूमी आहे. गोदाघाटावर तीसपेक्षा जास्त तीर्थ व कुंड असून यातील बरीचशी काळाच्या उदरात गडप झालेली आहेत. त्यांची स्थाननिश्चिती गरजेची असल्याची मागणी पुढे येत आहे.
नाशिकच्या रामतीर्थाला या तीर्थपरंपरेत मध्यवर्ती स्थान आहे. या परिसरात लक्ष्मणतीर्थ, सीतातीर्थ यांसारखी ३० हून अधिक तीर्थे आहेत. त्यामुळे गोवर्धन (गंगापूर गाव) पासून रोकडोबा मारुतीच्या समोरील मुक्तेश्वरापर्यंतचा हा पट केवळ नदीकाठ नसून धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित झाला आहे. ३० तीर्थांची संख्या एखाद्या एकाच उपलब्ध प्राचीन यादीतून निश्चित झालेली नसून विविध पुराणोक्त उल्लेख, स्थानिक पोथ्या आणि परंपरेतून ती रूढ झाल्याचे सांगितले जाते. या तीर्थांपैकी आठ ते दहाच कुंडांचा स्थानमहिमा व निश्चिती आहे. अनेक जुनी कुंडे काळाच्या ओघात बुजली, काही ठिकाणी काँक्रीटीकरण झाले, तर काहींचे अस्तित्वच स्थानिकांना माहीत नसल्याची स्थिती सध्या आहे. ज्या तीर्थांवर शतकानुशतके धार्मिक परंपरा टिकून आहे, त्यातील अनेक तीर्थे आज प्रत्यक्ष पाणी, स्वच्छता आणि अस्तित्वाच्या प्रश्नाला सामोरी जात आहेत. त्यामुळे सिंहस्थाच्या तयारीत केवळ घाट आणि कुंभमेळा व्यवस्थापन न करता ८४ तीर्थांचे दस्तऐवजीकरण, स्थळनिश्चिती, स्वच्छता आणि संवर्धन करण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.
--- चौकट
ही आहेत तीर्थे
गोवर्धन तीर्थ, पितृ तीर्थ, गालव तीर्थ, ब्रह्म तीर्थ, ऋणमोचन तीर्थ, कण्व अथवा क्षुधा तीर्थ, पापनाशन तीर्थ, विश्वामित्र तीर्थ, श्वेत तीर्थ, कोटी तीर्थ, अग्नितीर्थ, गणेश तीर्थ, शुर्पणखा तीर्थ, श्रीराम तीर्थ, लक्ष्मण कुंड, धनुष्य कुंड, सीता कुंड, अहिल्या कुंड, शारंगपाणी कुंड, दुतोंड्या मारुती कुंड, पाच देवळांचे कुंड, दशाश्वमेघ कुंड, रामगया कुंड, पेशवे कुंड, खंडोबा कुंड, ओकांचे कुंड, वैशंपायन कुंड, माळी कुंड, मुक्तेश्वर कुंड, इन्द्र कुंड यासह ५४ तीर्थ कुंड गोदावरी घाटावर आहेत.
---चौकट
त्र्यंबकेश्वरातील तीर्थांचाही समावेश
या परंपरेचा विस्तार त्र्यंबकेश्वरपर्यंत जातो. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी गोदावरीच्या उगमाशी संबंधित विविध तीर्थे, कुंडे आणि धार्मिक स्थळांचा उल्लेख जुन्या धार्मिक साहित्यात आढळतो. ८४ तीर्थांच्या पूजाविधीत नाशिकसोबत त्र्यंबकेश्वरातील काही तीर्थांचाही समावेश केला जातो. सिंहस्थकाळात आखाड्यांतील साधू-संतांकडून या तीर्थांना धार्मिक महत्त्व दिले जाते.
--- कोट
ब्रह्मपुराणाचा एक भाग असलेल्या गौतमी माहात्म्यात गोदावरी घाटावरील तीर्थ व कुंडांचा उल्लेख आला आहे. तसेच त्यावर आधारित गोदावरी माहात्म्य ही दासगणू महाराजांची स्वतंत्र पद्यरचना प्रसिद्ध आहे. काळाच्या उदरात गडप झालेल्या कुंडांची स्थाननिश्चिती झाली पाहीजे.
-देवेंद्रनाथ पंड्या, इतिहास संशोधक