फोटो : H28942
--
बासरी वादनाने बहरली
शास्त्रीय संगीत संध्या
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : अलवार बासरी वादनाचा कानावर पडणारे सूर, त्याचबरोबर शास्त्रीय गायनाच्या रागदारीवर रंगलेल्या मैफलीत उपस्थित रसिकांनी अनोखा श्रवणानंद मिळाला. निमित्त होते ‘शास्त्रीय संगीत संध्या’ कार्यक्रमाचे.
सूरकल्प फाउंडेशन आणि सप्तक फाउंडेशनतर्फे शनिवारी (ता. ५) सायंकाळी शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृहात कार्यक्रमात झाला. कार्यक्रमाची सुरुवात पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य समीर राव यांच्या सुरेल आणि भावस्पर्शी बासरी वादनाने झाली. सुरवातीला राव यांनी कृष्णकल्याण रागात पारंपरिक पद्धतीने आलाप, जोड सादर केला. पहाडी धुनमुळे कार्यक्रमाला रंगत आला. त्यांना मिलिंद म्हैसूर ह्यांनी तबल्यावर साथ केली. मध्यांतर नंतर जन्माष्टमी सण साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पं. रघुनंदन पणशीकर यांचे सुश्राव्य शास्त्रीय गायन रंगले. त्यांनी राग रागेश्रीमध्ये विलंबित तीनतालात पारंपरिक बडा ख्याल तसेच छोटा ख्याल सादर केला. त्यानंतर राग आनंद मल्हार या किशोरी आमोणकर यांची रचना असलेल्या रागात छोटा ख्याल सादर केला. मैफिलीचा समारोप ‘पद्मनाभा नारायणा’ अभंगाने केली. त्यांना तबल्यावर रसिक कुलकर्णी, संवादिनीवर ज्ञानेश्वर सोनवणे यांनी साथ केली. प्रास्ताविकात गायक आणि सुरकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. आशिष रानडे उपक्रमांची माहिती दिली. सप्तकचे धनंजय हेगडे यांनी संस्थेविषयी माहिती सांगितली. या वेळी जी. एस. हेगडे, पं. अविराज तायडे, विद्या पिंगळे, नितीन वारे मान्यवर उपस्थित होते. अनुराधा मटकरी यांनी सूत्रसंचालन केले.
----------