हॉर्कस- अतिक्रमण, विशेष पानासाठीच स्टोरी..
.........
अतिक्रमण हटवायचे कसे? मनपाकडे माणसेच अपुरी!
-----
शंभर ते दीडशे कर्मचाऱ्यांची गरज; प्रत्यक्षात ३५ कर्मचारी अन् दोनच वाहने
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : शहरातील अतिक्रमणावर प्रभावीपणे कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागालाच सध्या मनुष्यबळाची कमतरता भेडसावत आहे. संपूर्ण शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी किमान १०० ते १५० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना विभागाकडे केवळ ८ ते ९ कायमस्वरूपी कर्मचारी व २५ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातच कारवाईसाठी अवघी दोन वाहने उपलब्ध असल्याने अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविताना प्रशासनाची मोठी कसरत होत आहे.
जळगाव शहराचा विस्तार वाढत असताना प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा व रहिवासी भागांत दिवसेंदिवस हॉर्कसच्या अतिक्रमणाचा प्रश्न सातत्याने गंभीर होत आहे. रस्त्यांच्या कडेला वाढलेली दुकाने, हातगाड्या, फलक, पत्र्याचे शेड, विविध प्रकारच्या अनधिकृत बांधकामांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच पादचाऱ्यांचीही गैरसोय होत आहे. अशास्थितीत अतिक्रमणावर नियमित व सातत्यपूर्ण कारवाईची गरज असताना संबंधित विभागालाच अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करावा लागत आहे.
एकाच वेळी, एका ठिकाणी कारवाई
एका कारवाईसाठी पथक तयार करताना कर्मचारी, वाहन, सुरक्षा व्यवस्था व संबंधित यंत्रणांचा समन्वय आवश्यक असतो. मात्र, उपलब्ध कर्मचारी संख्या शहराच्या व्याप्तीच्या तुलनेत अत्यल्प असल्याने एकाच वेळी विविध भागांमध्ये कारवाई करणे शक्य होत नाही. परिणामी, एका भागात कारवाई सुरू असताना दुसऱ्या भागातील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता निर्माण होते.
मनुष्यबळ वाढविण्याची गरज
अतिक्रमण निर्मूलनासाठी आवश्यक मनुष्यबळाच्या तुलनेत सध्याची कर्मचारी संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे कायमस्वरूपी व कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासोबतच स्वतंत्र वाहने उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील अतिक्रमणांचा वाढता व्याप पाहता महापालिकेने विभागाचे मनुष्यबळ व साधनसामग्री वाढविली, तरच अतिक्रमणाविरोधातील कारवाई अधिक प्रभावी व सातत्यपूर्ण होऊ शकणार आहे.