सेकंडमेन
NSK26H28957 व NSK26H28958
जळगाव : अटकेतील संशयितांकडून जप्त केलेली सायलेन्सरसह आतील महागडी माती. दुसऱ्या छायाचित्रात जप्त केलेली कार.
-----------------------
सायलेंसर चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
--------
उत्तर प्रदेशातील चोरट्यांना अटक; ईको कारमालकांना सावधानतेचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : राष्ट्रीय महामार्गा(क्रमांक ५३)वरील म्हसवे गावाजवळ पारोळा पोलिस व महामार्ग पोलिसांच्या संयुक्त नाकाबंदीदरम्यान महागड्या मोटारकारचे सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वाहनांचे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर (सायलेंसर) चोरणाऱी आंतरराज्य टोळीतील दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. त्यांच्या ताब्यातून लोखो रुपयांचा चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे.
...अन् भांडं फुटलं
जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात पारोळा पोलिस ठाणे व महामार्ग पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे नाकबंदी करून वाहनांच्या तपासणीला सुरवात केली. यावेळी
महामार्गावरून जाणाऱ्या मारुती सुझुकी वॅगनार कारला (क्रमांक डीएल ३ सीबीयू ३३५८) पथकाने थांबविले. बारकाईने तपासणी केली असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
ताब्यात घेतलेले संशयित
आसीफ यामीन (वय २२, रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) याच्यासह आरीफ सलीम (वय २३, रा. अलीगड, उत्तर प्रदेश) या दोघांना ताब्यात घेतल्यावर गाडीची झडती घेतली. त्यात वाहनातून जुने वापरलेले ईको वाहनांचे तीन सायलेंसर कॅटॅलिटिक कन्व्हर्टर पाच ते सहा किलो ''सायलेंसर माती'' (कॅटॅलिटिक कन्व्हर्टर पावडर) असा जवळपास ५० हजारांचा ऐवज पोलिसांना आढळून आला.
''प्लॅटिनम''साठी चोऱ्या
वाहनातून निघणारा विषारी धूर व वायूप्रदूषण रोखण्यासाठी सायलेंसरमध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर बसविलेले असते. यात मधमाशांच्या पोळ्यासारख्या (Honeycomb) रचनेवर प्लॅटिनम, पॅलेडियम व रोडिअम यांसारख्या अत्यंत मौल्यवान धातूंचा लेप असतो. या धातूंना बाजारात मोठी किंमत मिळते. म्हणून चोरटे सायलेंसरची चोरी करून त्यातील पावडर विकत असल्याचे समोर आले आहे.
ईको गाड्याच टार्गेट का?
मारुती ईको मोटारकार गाड्यांची ग्राऊंड क्लिअरन्स (जमिनीपासूनची उंची) जास्त असल्याने वाहनाखाली सरकणे सोपे जाते व कमी वेळेत सायलेंसर सहज काढता येतो. त्यामुळेच चोरट्यांनी ईको गाड्यांना प्रामुख्याने लक्ष्य केले जात असल्याचे अटकेतील दोघांनी सांगितले.
आंतरराज्य नेटवर्कचा शोध सुरू
प्राथमिक चौकशीत ताब्यातील दोन्ही संशयितांनी मुंबई व ठाणे परिसरातही अशा प्रकारे चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. टोळीचे मुख्य सूत्रधार व चोरीचा माल खरेदी करणारे रॅकेट कोण चालवते?, याचा पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.