NSK26H28963
जळगाव : संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त समरसता संकल्प अभियानाअंतर्गत जन्मभूमीची पवित्र माती असलेल्या कलशाचे भाजप पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करताना आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, डॉ. चंद्रशेखर पाटील, आनंद सपकाळे आदी.
---------------
जळगावात समरसता संकल्प अभियान
-----
संत गुरू रविदास महाराज जयंतीनिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : शिरोमणी संत श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभर समरसता संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २६ जुलै २०२६ (गुरुपौर्णिमा) ते २० फेब्रुवारी २०२७ (माघ पौर्णिमा) या कालावधीत हे अभियान विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे केले जात आहे.
या अभियानांतर्गत समरसता दीप महोत्सव, कलश वंदन अभियान, श्री गुरु रविदास महाराज वसतिगृह संपर्क अभियान व श्री गुरु रविदास महाराज समरसता यात्रा असे विविध कार्यक्रम जळगाव शहरातील प्रत्येक प्रभागांत आयोजित करण्यात येत आहेत. श्रीसंत रविदास महाराज यांच्या जन्मभूमीची पवित्र माती घेऊन निघालेली कलश यात्रा नागपूर व छत्रपती संभाजीनगरमार्गे जळगाव येथे दाखल झाली. नुकताच हा पवित्र कलश जी. एम. फाउंडेशन येथील भाजप कार्यालयात भाजप मंडळ क्रमांक १, छत्रपती शिवाजीनगर मंडळाचे अध्यक्ष आनंद सपकाळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कलश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. हा पवित्र कलश जळगाव शहरातील भाजपच्या पाचही मंडळांमध्ये नेण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी संत गुरु रविदास महाराज यांच्या जीवनकार्याला उजाळा देत कलशाचे पूजन करण्यात येणार आहे. या संपूर्ण ‘समरसता संकल्प अभियानाची’ जबाबदारी संयोजक शिरीषकुमार तायडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.