शहर टुडे पान चारसाठी
---------
श्री ओंकारेश्वर मंदिरात
आज विविध कार्यक्रम
-------
श्रावण सोमवारनिमित्त १०८ निरंजन्यांनी महाआरती
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : दक्षिण भारतीय पद्धतीनुसार चतुर्थ श्रावण सोमवारनिमित्त शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री ओंकारेश्वर मंदिर सोमवारी (ता.७) दिवसभर दर्शनासाठी खुले राहणार आहे. यानिमित्त मंदिर परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी स्वतंत्र पाईप रेलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
श्रावण सोमवारनिमित्त मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईहून आणलेल्या विशेष फुलांनी भगवान शिवांचा नयनरम्य शृंगार करण्यात येणार आहे. सकाळी पाच ते सात या वेळेत शिवअभिषेक पूजन, तर सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत शिवषोडशोपचार अभिषेक पूजन होईल. दुपारी बाराला अभिजित मुहूर्तावर १०८ निरंजन्यांनी महाआरती होणार आहे.
यानंतर दुपारी साडेबारा ते चार या वेळेत श्री लघुरुद्र अभिषेक पूजन, तर सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत शिवरुद्राभिषेक पूजन होईल. सायंकाळी ६.१५ वाजता १०८ निरंजन्यांनी सायंआरती होणार आहे. रात्री ९.३० ते मध्यरात्री १२ या वेळेत श्री सत्संग भजन मंडळ जळगाव यांच्यातर्फे सुश्राव्य शिवभजनांचा कार्यक्रम होणार आहे.
दिवसभर भाविकांसाठी विशेष प्रसादाचे अखंड वितरण करण्यात येणार असून, सायंकाळी दीपदर्शनासाठी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. भाविकांनी भगवान ओंकारेश्वराचे दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त तथा व्यवस्थापक दीपक गजानन जोशी यांनी केले आहे.