सोमवारची मुलाखत : शहरातील रस्ते, खड्ड्यांनी गणेशोत्सव अडचणीत

सोमवारची मुलाखत : शहरातील रस्ते, खड्ड्यांनी गणेशोत्सव अडचणीत
Published on
लोगो : सोमवारची मुलाखत .... फोटो : H28961 .... मंडळांच्या बैठकीत ‘डीजे’ विषयी निर्णय घेणार समीर शेटे : शहरातील रस्ते, खड्ड्यांनी गणेशोत्सव अडचणीत लीड अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला असताना रस्त्यांची कामे आणि खड्ड्यांमुळे अनेक गणेश मंडळांना मंडप उभारण्यासाठी जागा नाही. लाडक्या गणरायाच्या आगमन मिरवणूक मार्गातील खड्ड्यांतून वाहने चालविणे जिकिरीचे होत असल्याचे सांगत, नाशिक महानगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर करावा की नाही, याबाबत येत्या दोन दिवसात मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले. - नरेश हाळणोर ..... प्रश्न : गणेशोत्सवाचे बदलत चाललेले स्वरूप तुम्ही कसे पाहता? समीर शेटे : काळानुसार सण साजरी करण्याची पद्धत बदलते, हे स्वाभाविक आहे. तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पनांमुळे उत्सवाला भव्यता आली आहे; परंतु या भव्यतेत सणाचा मूळ उद्देश, सांस्कृतिक गाभा आणि सामाजिक एकोपा टिकून राहणे गरजेचे आहे. केवळ भव्यता नसून पारंपरिक भक्ती आणि सामाजिक भान टिकवणे हेच खरे आव्हान आहे. -- यंदाच्या गणेशोत्सवात महत्त्वाचे प्रश्न काय आहेत? : सर्वात महत्त्वाचे म्हणजे रस्ते आणि खड्डे. सिंहस्थामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. जागोजागी खड्डे आहेत. यामुळे आजघडीला शहरातील १० मोठ्या मंडळांना मंडप उभारण्यासाठी जागा नाही. त्यामुळे त्यांना यंदा गणेशोत्सव साजरा करता येणार नाही. आगमन आणि विसर्जन मिरवणूक मार्गांवर खड्डेच खड्डे आहेत. यातून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही मोठी समस्या उभी राहिली आहे. -- मिरवणूक मार्गांवर अजूनही वीजतारांचा प्रश्न आहेच? : हो, तो प्रश्न तर आहेच. परंतु गणेश मंडळांना वीजजोडणी देताना अनामत रक्कम घेतली जाते. ती परत केली जात नाही. तसेच, भरमसाठ वीजबिल आकारले जाते. सांगताना मात्र, कमी दराने वीज मिळेल असे आश्वासन दिले जाते, प्रत्यक्षात व्यावसायिक दराने बिल आकारले जाते. महापालिकेकडे अव्वाच्या सव्वा दराने जागेचे भाडे आकारले जाते. -- उत्सवातील ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी डीजेबाबत आपली भूमिका काय? : मुंबई- पुण्याच्या तुलनेत नाशिकमध्ये डीजेचे प्रमाण कमी आहे आणि नियमांचे पालन केले जाते. महत्त्वाचे म्हणजे, अन्य सण, मिरवणुकांमध्ये डीजे वाजविला जातो, त्या वेळी हा विषय चर्चेला येत नाही. परंतु गणेशोत्सवात तो चर्चेला येतो, यावरही चर्चा व्हायला हवी. तरीही नाशिकमधील मंडळांची दोन दिवसात बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. -- डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर वाढवणे हा योग्य पर्याय आहे का? : नक्कीच! आपले ढोल-ताशा, झांज, लेझीम आणि पारंपरिक लोककला हाच आपल्या संस्कृतीचा आत्मा आहेत. या वाद्यांमुळे मिळणारा उत्साह, ऊर्जा आणि आनंद कोणत्याही डीजेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो. त्यामुळे अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य दिले आहे. गतवर्षी डीजेचा वापर झाला असला तरी ध्वनिमर्यादेचे पालन केले होते. कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही याकडे लक्ष दिले जाते. -- गणेशोत्सवाचे बदलत्या स्वरूपाविषयी काय सांगाल? : अलीकडे गणेशोत्सव साजरा करणे आर्थिकदृष्ट्या सोपे राहिलेले नाही. एकीकडे महागाई वाढत असताना, त्या तुलनेत गणेश मंडळांची आर्थिक स्थिती तितकीशी भक्कम राहिलेली नाही. त्यातही सध्या निवडणुकांचा माहौल नसल्याने मंडळांसमोर देणगीदारांचा प्रश्न उभा राहिला आहे. तरीही हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण असल्याने पदरमोड करून काही मंडळांकडून उत्सव साजरा केला जात आहे. --- विसर्जन मिरवणुकीत नियमांचे पालन केले जाते का? : नक्कीच. गेल्या वर्षी मध्यरात्री बाराच्या ठोक्याला मिरवणूक थांबविण्यात आली. त्या वेळी शेवटचा गणपती रविवार कारंजाच्या पुढे होता. तसेही नाशिकमध्ये अजूनही गणेश मंडळांकडून शिस्त पाळली जाते. प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो निर्विघ्न पार पडतोच. तसा यंदाही पार पडेल. परंतु यावेळी खूप अडचणींना सामोरे जावे लागते आहे. मात्र गणपती बाप्पा यातून नक्कीच मार्ग दाखवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com