NSK26H28975
जळगाव : भाजप पूर्व जिल्ह्याच्या रविवारी ब्राह्मणसभेत झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री गिरीश महाजन. व्यासपीठावर मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण आदी.
---
पुढचा काळ वाटतो तेवढा सोपा नाही!
उपशीर्षक
गिरीश महाजन : भाजपच्या बैठकीत ‘जेन-झी’वर मंथन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाची प्रगती, विकास होतोय, पण विरोधकांकडून दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे येणारा काळ वाटतो तेवढा सोपा नाही, असे सांगत भारतात तरुणांची संख्या मोठी आहे. त्यांच्या बळावरच देशाला विश्वगुरू होता येईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ‘जेन-झी’वर फोकस करणे गरजेचे आहे, असे आवाहन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
भाजप जळगाव पूर्व जिल्ह्याची बैठक रविवारी (ता. ६) ब्राह्मणसभेत झाली. त्याप्रसंगी श्री. महाजन बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे, आमदार नंदकिशोर महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. राजेंद्र फडके, केतकी पाटील, माजी आमदार अरुण पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर आदी उपस्थित होते.
रक्षा खडसे, संजय सावकारे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले.
सोशल मीडिया प्रभावी शस्त्र
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, की आज राज्यात आणि देशात घडणाऱ्या राजकीय-सामाजिक घडामोडी आपण पाहत आहोत. एखादा मुद्दा किंवा घटना अचानक मोठी करून जनतेसमोर आणली जाते. त्यामुळे भविष्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे महत्त्व आणखी वाढणार आहे. कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा अभ्यासपूर्ण, संयमी आणि प्रभावी वापर करून सरकारची विकासकामे, जनकल्याणकारी योजना आणि पक्षाची ध्येयधोरणे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावीत.
चौकट
जिल्हा बँक, दूध संघ एकहाती ताब्यात घ्या
आगामी काळात कोणतीही निवडणूक आली, तरी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने सज्ज राहावे. जळगाव जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक परिस्थिती मजबूत आणि अनुकूल आहे. मात्र, आत्मसंतुष्ट न राहता प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी बूथपासून जिल्हास्तरापर्यंत कामाला लागावे. जिल्हा बँक आणि जिल्हा दूध संघ, जिल्हा परिषद ताब्यात घेण्याची तयारी ठेवा, असे आवाहन श्री. महाजन यांनी केले.