सेकंड मेन
फोटो : H28971
नाशिक : रस्तेकामाची पाहणी करताना आयआयटी, पवई या संस्थेतील तज्ज्ञांचे पथक.
---------------
काँक्रिट रस्त्यांची ‘आयआयटी’कडून पाहणी
‘कोअर कट’ द्वारे प्राथमिक तपासणी; विविध ठिकाणी भेटी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : शहरात सुरु असलेल्या रस्ते उभारणी कामांची गुणवत्ता तपासणीसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), पवई येथील तज्ज्ञांनी भेट दिली. विविध तीन प्रमुख रस्त्यांची पाहणी करताना काँक्रिट रस्त्याचा कोअर कट घेऊन प्रत्यक्ष जाडीची व इतर प्राथमिक तपासणी केली.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांमध्ये सर्वात महत्त्वाच्या असलेल्या नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्याचा पाहणीमध्ये समावेश होता. खडकाळी सिग्नल ते आयटीआय सिग्नल, पिंपळगाव बहुला आणि गरवारे ते एक्स्लो पॉइंट या तीन रस्त्यांचा पाहणीमध्ये समावेश होता. रस्त्याच्या बांधकामाची प्रत्यक्ष स्थिती, काँक्रिटची गुणवत्ता तसेच बांधकामासंदर्भातील तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात आली. यावेळी काही ठिकाणी कोअर कट घेतले. यातून रस्त्याच्या आतील भागातील काँक्रिटच्या थराची तपासणी करत, प्रत्यक्ष जाडी मोजली. प्राथमिक तपासणीनुसार तांत्रिक मानकांनुसार काम योग्य असल्याचे आढळले. तसेच इतर काम सुरु असलेल्या काही भागांमध्ये पाहणी केली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पावसाळी पाण्याचा निचरा, वाहतूक नियोजन आदी बाबींवर चर्चा झाली. महापालिकेकडून रस्ते कामांच्या गुणवत्तेसाठी अंतर्गत गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेसोबत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार व तृतीय-पक्ष गुणवत्ता तपासणीची कार्यपद्धतीही अवलंबली जात असल्याची माहिती यावेळी दिली. स्वतंत्र तांत्रिक संस्थांच्या माध्यमातून कामांची नियमित तपासणी केली जात असल्याचेही सांगितले. पाहणीदरम्यान महापालिकेचे अभियंता नितीन पाटील आणि कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, रवींद्र पाटील, नीलेश साळी, हेमंत नांदुर्डीकर आदी उपस्थित होते.