एन्कर
--
फोटो : B60875
गणरायाच्या स्वागतासाठी ढोल पथकांची जय्यत तयारी
गुरुपौर्णिमेपासून सरावाला सुरवात ; शहरभर उत्साहाचे वातावरण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६: आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी शहरातील ढोलताशा पथकांची माेकळ्या मैदांनावर जय्यत तयारी सुरू असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सवाचे वेध लागताच शहरात ढोलताश्यांचा निनाद गुंजू लागला आहे. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर विविध ढोल पथकांनी पारंपरिक वाद्य पूजन आणि ध्वज पूजन करून सरावाला सुरवात केली.
‘नाशिक ढोल जगात भारी’ या बिरुदाची परंपरा जपत तरुण- तरुणी तासनतास सराव करीत असून मोकळ्या मैदानावर सायंकाळच्या सत्रात कानांवर ढोल ताशांचा नाद घुमू लागला आहे. पथकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय असून, नोकरदार महिला दिवसभर काम करून सायंकाळच्या सत्रात वादनाच्या सरावासाठी मैदानावर येत आहेत. सुरवातीला ढोल बांधण्यापासून ते ढोल बांधून चालण्याचा सराव करवून घेतला जातो. तत्पूर्वी पथकात सहभागी झालेल्या नवोदित वादकांना ढोलाचा इतिहास आणि वादनाची शास्त्रीय माहिती दिली जाते. लाखोंच्या जनसमुदायासमोर वादन करताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून विशेष भर दिला जातो. गणेशोत्सवापूर्वी मंडळांच्या गणपतीचा आगमन सोहळे सुरू झाले असून, ढोल वादनाच्या निनादाने नवचैतन्य पसरले आहे. शहरात साधारण ३५ ढोल पथक असून सरावासाठी वार्षिक अगदी नाममात्र शुल्क वादकांकडून घेतले जाते.
--चौकट
ताण कमी करण्याचे माध्यम
संगीत केवळ साधन नसून, ताणतणाव कमी करण्याचे उत्तम वाद्य आहे. ढोल वादनाचा मनावर आणि शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. ढोल वाजविण्यासाठी संपूर्ण शरीराची, विशेषतः हातांची आणि खांद्यांची ताकद लागते. हा एक प्रकारचा चांगला कार्डिओ व्यायाम आहे, ज्यामुळे शरीरात साठलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. ढोल वाजवताना तालावर आणि लयीवर लक्ष केंद्रित करावे लागते. यामुळे मनातील चिंता आणि विचार काही काळ बाजूला राहतात, त्यातून मनाला शांतता मिळते. मनात असलेला राग, नैराश्य किंवा थकवा ढोलाच्या आवाजातून आणि ताकदीतून बाहेर पडतो. हा एक प्रकारे भावना व्यक्त करण्याचा मार्ग आहे. जेव्हा समूहात वादन केले जाते तेव्हा तेथील ऊर्जा आणि एकमेकांसोबतचे नाते मनाला एक वेगळाच आनंद आणि उत्साह देऊन जाते.
--- कोट
यंदाही महिलांचा चांगला प्रतिसाद असून सरावासाठी दररोज ८० महिला, तर दोनशे वादक वादनाचा सराव करीत आहेत. त्याचबरोबर गणरायाच्या आगमन सोहळ्यासाठी पथकाला मागणी आहे.
- कुणाल अहिरे, नटनाद ढोल पथक
--------------------