NSK26H28977
जळगाव : दूध उत्पादक संस्थांच्या चेअरमन कार्यशाळेचे उद् घाटन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील. सोबत इतर मान्यवर.
------
उत्पादक सक्षम झाल्यास दूध संघही सक्षम
-----
पालकमंत्री : उत्पादकांच्या प्रश्नांसाठी दर तीन महिन्यांनी कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.६ : दूध उत्पादक हा दूध संघाचा खरा केंद्रबिंदू आहे. म्हणून दूध उत्पादक सक्षम झाला, तरच दूध संघ खऱ्याअर्थाने सक्षम होईल, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे येथील यश लॉन्स येथे रविवारी (ता.६) आयोजित सात तालुक्यांच्या दूध उत्पादक संस्थांच्या चेअरमन कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री बोलत होते. जळगाव, धरणगाव, एरंडोल, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर व जामनेर या सात तालुक्यांतील ३२८ दूध उत्पादक संस्थांचे चेअरमन, सचिव व प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी होते.
पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले की, कापूस उत्पादकांसाठी ज्याप्रमाणे ‘सीसीआय’ महत्त्वाची भूमिका बजावते, दूध उत्पादकांसाठी सहकारी दूध संघ व गावपातळीवरील दूध संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे उत्पन्न वाढविणे, त्यांना योग्य बाजारपेठ व दर मिळण्यासाठी सहकारी व्यवस्था मजबूत करणे, शासन व एनडीडीबीच्या विविध योजनांचा लाभ पात्र पशुपालकांपर्यंत पोहोचविणे, दूध संकलनासोबत गुणवत्तेत वाढ करणे याला संघाने प्राधान्य द्यावे.
संचालक प्रमोद पाटील यांनी खासगी दूधविक्री कमी करून संघाचे दूध संकलन वाढविण्यासोबतच दुधाची गुणवत्ता, फॅट व एसएनएफ सुधारण्यावर भर देण्याचे आवाहन केले. उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या, संघाला सातत्याने गुणवत्तापूर्ण दूध पुरवठा करणाऱ्या सुमारे २२ दूध उत्पादक संस्थांचा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यशाळेस संचालक मधुकर राणे, अरविंद देशमुख, शामल झांबरे, छाया देवकर, दगडू चौधरी, रमेश पाटील, नितीन चौधरी, प्रमोद पाटील, कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संकलन विभागाचे व्यवस्थापक जयेश पाटील यांनी केले. दूध संघाचे संचालक रमेश पाटील यांनी आभार मानले.