कानोसा बाजारपेठेचा
---
गवार १६० रुपये किलो; फळभाज्या महाग, पालेभाज्या स्वस्त
वेलवर्गीय भाज्या कवडीमोल भावाने; कांदा-बटाटा आवाक्यात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : पावसाची अधूनमधून लागणारी हजेरी आणि वातावरणातील बदलांचा परिणाम भाजीपाल्याच्या बाजारावर दिसून येत आहे. सध्या नाशिकच्या बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक चांगली असल्याने त्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दुसरीकडे, काही फळभाज्यांचे दर वाढल्याने गृहिणींच्या स्वयंपाकघरातील बजेटवर परिणाम होत आहे. विशेषतः गवारीचा दर तब्बल १६० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ही भाजी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.
सध्या बाजारात मेथीची जुडी १० रुपये, तर कोथिंबीर, पालक आणि शेपू प्रत्येकी २० रुपये जुडी मिळत आहेत. कांदापातीचा दर ३० रुपये जुडी आहे. त्यामुळे पालेभाज्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे. मात्र, गवार आणि भुईमुगाच्या शेंगांचे दर चांगलेच वाढले आहेत. भुईमुगाच्या शेंगा सध्या सुमारे १२० रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. फळभाज्यांमध्येही काही प्रमाणात दरवाढ झाली असली, तरी टोमॅटो आणि भेंडीचे दर तुलनेने स्थिर आहेत. दोन्ही भाज्या सध्या ३० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. वेलवर्गीय भाज्यांची आवक वाढल्याने त्यांच्या दरात मात्र मोठी घसरण झाली आहे. वेलवर्गीय भाज्यांमध्ये घेवडा, पापडी वाल, कारले, दोडके, गिलके या २५ ते ३० रुपये पावशेर भावाने मिळत आहेत.
गवारीचे दर आगामी काळातही असेच राहिल्यास महिनाअखेरीस सुरू होणाऱ्या पितृपक्षाच्या पार्श्वभूमीवर गृहिणींना भाजीपाल्याचे बजेट सांभाळताना कसरत करावी लागू शकते. त्यामुळे पुढील काही दिवसांत आवक वाढून गवारीसह महागलेल्या भाज्यांचे दर कमी होतात का, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
---