छायाचित्र : 00818, 00819
हरसूल : आश्रमशाळांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी ‘भीक मांगो’ आंदोलन करताना जीवन भोये, विवेक गवळी आदी. दुसऱ्या छायाचित्रात आंदोलनस्थळी उपस्थित आमदार हिरामण खोसकर, विनायक माळेकर आदी. (छायाचित्र : राहुल बोरसे)
---------------
३६-४
हरसूल येथे ‘भीक मांगो’ आंदोलन सुरू
--------------
आश्रमशाळांतील समस्यांकडे लक्षवेध ः ‘विद्यार्थ्यांच्या हिताला संस्थेचे प्राधान्य’
सकाळ वृत्तसेवा
हरसूल, ता. ६ ः अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे तसेच अनिवासी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासन आणि संस्थाचालकांचे लक्ष वेधण्यासाठी जीवन भोये व विवेक गवळी यांच्या नेतृत्वाखाली येथे ‘भीक मांगो’ आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात निषेध म्हणून नागरिकांकडून केवळ चिल्लर स्वीकारली जाते. जमा झालेली ही सर्व रक्कम संबंधित संस्थेला देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या हलाखीच्या स्थितीची जाणीव संबंधितांना व्हावी, यासाठी हे आंदोलन होत आहे.
.......
आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना जीवघेण्या परिस्थितीत राहावे लागत आहे. त्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत काही मागण्या मांडल्या आहेत. त्या अशा ः शाळा परिसराला संरक्षक भिंत, रात्री पथदिवे, विद्यार्थ्यांना स्वतंत्र बेड, गाद्या, स्वच्छ स्वच्छतागृहे, पिण्यासाठी शुद्ध पाणी, सोलर वॉटर हीटर, कपडे धुण्याची स्वतंत्र व्यवस्था, विद्यार्थिनींसाठी सुरक्षित सुविधा, तक्रार पेटी, सफाई कर्मचारी व निवासी परिचारिकांची नियुक्ती, आधुनिक संगणक शिक्षण, सुसज्ज प्रयोगशाळा आणि वाचनालयाच्या सुविधा उपलब्ध कराव्यात.
आंदोलनप्रसंगी आमदार हिरामण खोसकर, विनायक माळेकर, डॉ. रघुनाथ भोये, मिथुन राऊत, योगेश आहेर, लक्ष्मण मेघे, राहुल चौधरी उपस्थित होते. ग्रामस्थांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन चिल्लर स्वरूपात भीक द्यावी, असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधा, शिक्षणाचा दर्जा याबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेत सकारात्मक निर्णय घ्यावा, मागण्यांची पूर्तता होईपर्यत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जीवन भोये व विवेक गवळी यांनी सांगितले.
---------------
१६-१
वस्तुस्थिती जाणून घ्यावी
गेल्या सहा दशकांहून अधिक काळापासून संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. विशेषतः मुलींच्या आरोग्याबाबत आम्ही संवेदनशील आहोत. विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य, क्रीडा सुविधा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक संधी उत्तम प्रकारे उपलब्ध करून देत आली आहे. यापुढेही त्यात सातत्याने भर घातली जाईल. वस्तुस्थिती समजून न घेता पसरविल्या जाणाऱ्या अफवा किंवा अपप्रचारामुळे पालकांनी किंवा समाजाने गैरसमज करून घेऊ नये, असे संस्थेतर्फे स्पष्ट करण्यात आले.
-------------------------
कोट
आमच्यासाठी प्रत्येक विद्यार्थी हा आमच्या कुटुंबातील एक मुलगा किंवा मुलगी आहे. त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता, स्वच्छतेला कोणत्याही परिस्थितीत दुय्यम स्थान दिले जाऊ शकत नाही. सध्या उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करीत असून, येत्या काळात त्या आणखी सक्षम आणि अद्ययावत करण्यात येतील. विद्यार्थ्यांना स्वच्छ परिसर, पौष्टिक व दर्जेदार भोजन, सुरक्षित निवास, आरोग्य सुविधा आणि आवश्यक त्या मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी संस्था पूर्ण क्षमतेने प्रयत्नशील आहे.
- डॉ. अपूर्व हिरे, समन्वयक,
महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती, नाशिक
-----------