पान-२
---
NCTY26B60876
शंकराचार्य कुर्तकोटी न्यास : इन्सुलिन समज-गैरसमज परिसंवादात सहभागी डॉ. विजय घाटगे, डॉ. नितीन घैसास, डॉ. चंद्रकांत संकलेचा, डॉ. विनिता देशपांडे, संवादक नंदन दीक्षित.
---------------
आजार दूर ठेवण्यासाठी इन्सुलिन हवे समतोल
---
तज्ज्ञांचा सूर ः संस्कृतिवैभव, मैत्र जिवाचे फाउंडेशनतर्फे परिसंवादात उलगडले महत्त्व
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ ः इन्सुलिन हा शरीराचा राजा असून, तो खूश राहिला की अवयवरूपी प्रजाही खूश राहते. इन्सुलिन या संप्रेरकाचा (हॉर्मोन) शरीरातील समतोल राखल्यास मधुमेह, हृदयविकार यांसह जीवनशैलीशी निगडित बहुतांश आजारांना दूर ठेवता येऊ शकते, असा सूर तज्ज्ञांनी व्यक्त केला.
संस्कृतिवैभव आणि मैत्र जिवाचे फाउंडेशन यांच्यातर्फे गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यास संकुलातील डॉ. कुर्तकोटी सभागृहात आयोजित परिसंवादाप्रसंगी सहभागी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ‘डॉक्टर्स ऑन ड्यूटी- औषधांच्या पलीकडे’ या संकल्पनेवर आधारित या परिसंवादात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन घैसास, ज्येष्ठ फिजिशियन डॉ. विजय घाटगे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत संकलेचा आणि जीवनशैली मार्गदर्शक डॉ. विनिता देशपांडे यांनी सहभाग घेतला.
डॉ. घैसास म्हणाले, की शरीराचा बराच कारभार संप्रेरकांवर चालतो. यात जीवनशैलीशी निगडित आजारांचा विचार केल्यास इन्सुलिन हा राजा आहे. हे सप्रेरक ऊर्जेच्या व्यवस्थापनात मोलाची भूमिका बजावतात. रक्तातील वाढलेली साखर ही रक्तवाहिन्यांना इजा पोहोचवत असते. त्याचे आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात.
डॉ. विनिता देशपांडे म्हणाल्या, की इन्सुलिनला खूश केले पाहिजे; पण त्याची खुशामती करायला नको. जितक्या प्रमाणात साखर निर्माण होते, तितक्या प्रमाणात इन्सुलिन निर्माण होणे गरजेचे असते. त्यामुळे वापर न झालेली साखर शरीराच्या विविध भागांमध्ये ढिगाच्या रूपाने साठते.
डॉ. चंद्रकांत संकलेचा म्हणाले, की आयुष्याच्या विविध टप्प्यांवरून वाटचाल करताना महिलांच्या आरोग्यावर इन्सुलिनचा महत्त्वाचा प्रभाव असतो. किशोरावस्था, गर्भावस्था, रजोनिवृत्ती अशा विविध स्तरांवर हे संप्रेरक महिलांच्या आरोग्यावर परिणाम करते.
डॉ. विजय घाटगे यांनी सायकोसोमॅटिक आजार ही संकल्पना उपस्थितांसमोर उलगडून सांगितली. मनातील विचारांचा शरीरावर मोठा परिणाम होत असतो. या मनाचा शरीरावर असलेल्या प्रभावामुळे उद्भवणाऱ्या आजारांना सायकोसोमॅटिक असे संबोधले जाते, असे नमूद केले.
जाहिरात तज्ज्ञ नंदन दीक्षित व किशोरी किणीकर यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. दत्तप्रसाद निकम यांनी प्रास्ताविक केले.
----------------