जिल्ह्यात उत्कृष्ट सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा
विजेत्या मंडळांना मिळणार रोख पारितोषिके
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ७ : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे २०२६ च्या गणेशोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत व परवानाधारक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा स्पर्धा समितीचे सदस्य सचिव शशांक काळे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पहिल्या तीन विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. विजेत्यांना प्रथम क्रमांक ५० हजार रुपये रोख व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक ४० हजार रुपये रोख व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक ३० हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत नोंदणीकृत संस्था अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेच सहभागी होऊ शकतील. पात्र मंडळांनी अकादमीच्या अधिकृत पोर्टलवरून ११ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन सादर करायचा आहे. चालू वर्षाच्या मागील सलग दोन वर्षे राज्य अथवा जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त झालेल्या मंडळांना या स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही. मंडळांनी मागील वर्षाच्या अनंत चतुर्दशीपासून चालू वर्षाच्या अनंत चतुर्दशीपर्यंत केलेल्या सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणपूरक कामांचा कालावधी मूल्यमापनासाठी ग्राह्य धरला जाईल. स्पर्धेचे समन्वयक म्हणून संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी हे कामकाज पाहणार आहेत.