टुडे एक ॲंकर (जिल्हा - शहर कॉमन)
--
समर्पक फोटो वापरता येईल.
–––
‘स्वच्छ, सुंदर जळगाव’ जिल्ह्यासाठी घनकचरा व्यवस्थापन
(उपशीर्षक)
नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश; १५ पर्यंत आराखडा तयार करण्याची सूचना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : जिल्हा स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्रशासनाने ‘स्वच्छ, सुंदर व हरित जळगाव’ हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. यात घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणीबाबत सर्व ग्रामपंचायतींना निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने १५ सप्टेंबरपर्यंत घनकचरा व्यवस्थापनाचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गावांमध्ये कचरा विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था नसते. यामुळे ग्रामस्थ कचऱ्यासह अन्न देखील उकिरड्यावरच टाकत असतात. यामुळे आता घनकचऱ्याचे ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजी अशा चार प्रवाहांत वर्गीकरण करून त्याचे संकलन व योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी उपलब्ध मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांचा वापर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिल्या आहेत.
घरोघरी कचरा संकलन
ग्रामपंचायत स्तरावर नियमितपणे घरोघरी कचरा संकलन करण्यात येणार आहे. यासाठी उपलब्ध स्वच्छता कर्मचारी, स्वच्छतादूत तसेच बचत गटांचा सहभाग घेण्याचे नियोजन आहे. ग्रामपंचायतींकडील ट्रायसायकल, ट्रॅक्टर, फॅब्रिकेशन शेड आणि कचरा संकलन केंद्रांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वित्त आयोगाचा निधी
घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा, उपकरणे आणि मनुष्यबळासाठी ग्रामपंचायतींना १५ वा व १६ वा वित्त आयोग तसेच स्वनिधीचा वापर करता येणार आहे. आवश्यक मनुष्यबळाची नियुक्तीही उपलब्ध निधीतून करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी स्वतंत्र कृती आराखडा प्रत्येक ग्रामपंचायतीने १५ सप्टेंबरपर्यंत तयार करावयाचा आहे.
इन्फो
विस्तार अधिकाऱ्यांवर जबाबदारी
कचरा संकलन, वर्गीकरण, देखरेख, नियंत्रण आणि अहवाल संकलनासाठी प्रत्येक गणनिहाय किंवा जास्तीत जास्त पाच ग्रामपंचायतींसाठी विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. कचरा संकलन, वर्गीकरण, देखरेख, नियंत्रण व अहवाल संकलनाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. तर जिल्हास्तरावर ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे.