फोटो : NSK26H29020 /NSK26H29021
नंदुरबार : अष्टाने (ता. साक्री) ते रंजनपुर (ता. तळोदा) संत श्री. गुलाम महाराज पदयात्रेत सहभागी झालेले भाविक. दुसऱ्या छायाचित्रात पदयात्रेतील पालखी.
-----------------------------
संत गुलाम महाराज
पदयात्रेचे स्वागत
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार : ‘आपकी जय परिवारा’तर्फे अष्टाने (ता. साक्री) येथून काढण्यात आलेल्या संत श्री. गुलाम महाराज पालखी पदयात्रेचे नंदुरबारला जल्लोषात स्वागत करण्यात आले. भाविकांनी पदयात्रेत सहभाग घेऊन पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. अष्टाने ते रंजनपूर अशी शंभर किलोमीटर अंतराची ही पदयात्रा काढण्यात आली असून, हजारोच्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत.
सन १९३७ पासून दरवर्षी श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी ही पदयात्रा काढली जाते. पदयात्रेचे हे ८९ वे वर्ष असून, यात सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविक येत असतात. ३ सप्टेंबरला अष्टाने येथून ही पदयात्रा निघाली असून, नंदुरबारला पोहचल्यावर भाविकांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. नंदुरबार शहरातील आमदार कार्यालयाजवळ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी पालखीचे पूजन करून दर्शन घेतले. या पदयात्रेत भाविकांनी सहभागी होत संत गुलाम महाराजांचा जयघोष केला. शहरातील प्रमुख मार्गावरुन ही पालखी पदयात्रा निघाली असून, नंदुरबारमार्गे पुढे तळोद्याकडे रवाना झाली. सोमवारी (ता. ७) तळोदा तालुक्यातील रंजनपूर येथे पालखी पदयात्रा पोहोचली. या ठिकाणी भजन कीर्तनासह विविध कार्यक्रम होणार आहेत. रंजनपुर येथे ही पदयात्रा पोहोचल्यावर चौपाळे, विविध भागातून भाविक संत श्री. गुलाम महाराजांच्या दर्शनासाठी येणार असल्याची माहिती या परिवारातील सदस्य जितेंद्र पाडवी यांनी दिली.