फोटो : NSK26H29024 (लोगो)
---------------------
नंदुरबार येथे २२ सप्टेंबरला
‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव
नंदुरबार, ता. ७ : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे जतन, संवर्धन आणि नव्या पिढीपर्यंत लोककलेचा वारसा पोहोचविण्याच्या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेतर्फे नंदुरबार येथे २२ सप्टेंबरला एस. ए. मिशन हायस्कूल जिमखाना येथे ‘जल्लोष लोककलेचा’अंतर्गत एकल व समूह लोककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. बालरंगभूमी परिषदेच्या नंदरबार जिल्हा शाखेचे अध्यक्ष तथा राज्य कार्यकारिणी सदस्य नागसेन पेंढारकर यांनी याबाबत माहिती दिली.
बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षा ॲड. नीलम शिर्के- सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विविध लोककला प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पाचही लोककला प्रकारांत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कलाकारांना राज्यस्तरीय लोककला स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. ‘जल्लोष लोककलेचा’ अंतर्गत एकल नृत्य, एकल गायन, एकल वाद्य, समूह नृत्य आणि समूह गीतगायन या पाच लोककला प्रकारांच्या स्पर्धा यात होणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत प्रमुख सैय्यद इसरार अली, उपप्रमुख तुषार सोनवणे, सदस्य म्हणून तुषार ठाकरे, भीमसिंग वळवी आणि काशिनाथ सूर्यवंशी यांचा समावेश आहे. विद्यार्थी व बालकलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखेचे अध्यक्ष नागसेन पेंढारकर, कार्याध्यक्ष मनोज सोनार, प्रमुख कार्यवाहक राजेश जाधव, उपाध्यक्ष नंदकिशोर सूर्यवंशी यांच्यासह शाखेच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.