भूमिअभिलेख उपअधीक्षकास तीन वर्षांचा कारावास
विशेष न्यायालयाचा निकाल; चार हजारांची लाच भोवली
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : शेतगटाच्या नकाशातील चुकीची नोंद दुरुस्त करून मूळ प्रकरण पुढील कारवाईसाठी पाठविण्यासाठी चार हजारांची लाच स्वीकारणारे देवळा येथील तत्कालीन भूमिअभिलेख उपअधीक्षक सुरेश पर्वत वेताळ यास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. कथारे यांनी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच तीन हजारांचा दंडही ठोठावला.
तक्रारदार यांच्या मौजे चिंचवे (ता. देवळा) येथील शेतगटाच्या एकत्रीकरण योजनेतील नकाशात चुकीची नोंद झाली होती. ही नोंद दुरुस्त करून मूळ प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यासाठी सुरेश वेताळ याने तक्रारदाराकडे चार हजारांच्या लाचेची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार ३० मार्च २०१२ ला पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. तडजोडीनंतर भूमिअभिलेख कार्यालय, देवळा येथील आपल्या दालनात लाचेची रक्कम स्वीकारताना वेताळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले होते.
या प्रकरणी देवळा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. तपास पूर्ण झाल्यानंतर १४ मार्च २०१४ ला नाशिकच्या विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी अभियोक्ता विजय गायकवाड आणि शिरीष कडवे यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. सादर करण्यात आलेले पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. कथारे यांनी सुरेश वेताळ यास तीन वर्षांच्या कारावासाची व तीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणी पोलिस निरीक्षक राहुलकुमार नाईक, कोर्ट पैरवी अंमलदार प्रदीप काळोगे, हवालदार प्रफुल्ल माळी आणि विलास निकम यांनी पाठपुरावा केला.