सेकंड मेन
--
नऊ गावांसाठी ‘गोदावरी’जवळ रेल्वे थांब्याची मागणी
हजारो विद्यार्थी, रुग्ण व नागरिकांना होणार फायदा; रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुराव्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक संकुल व रुग्णालयाच्या परिसरातील हजारो विद्यार्थी, रुग्ण, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी भुसावळ-भादली रेल्वेमार्गावरील किलोमीटर ४३५–४३६ दरम्यान नवीन हॉल्ट स्टेशन सुरू करावे, अशी मागणी सोमवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. या ठिकाणी रेल्वेस्थानक झाल्यास परिसरातील नऊ गावांसह शैक्षणिक संस्थांना मोठा फायदा होणार असल्याचे गोदावरी फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी सांगितले.
गोदावरी फाउंडेशनचा सुमारे १४० एकर परिसर असून, येथे विविध शैक्षणिक संस्था, गोदावरी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज आहे. त्यामुळे जळगाव तसेच भुसावळ येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांसह रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. सध्या या परिसरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर भादली रेल्वेस्थानक आहे. मात्र, या स्थानकावर प्रवाशांची संख्या अत्यल्प असून रेल्वेगाड्याही थांबत नसल्याने त्याचा अपेक्षित उपयोग होत नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. तसेच आजूबाजूच्या गावांना येण्या-जाण्यासाठी एसटी व खासगी प्रवासी रिक्षा या देखील अल्प असल्याने या ठिकाणी रेल्वेस्थानक झाल्यास अनेकांना रोजगार तसेच व्यवसाय देखील मिळणार आहे. या प्रस्तावित हॉल्ट स्टेशनचा लाभ नशिराबाद, भादली, जळगाव खुर्द, खिर्डी, टिगरे, गोम्ही, कडगाव, सुनसगाव आणि साकेगाव या गावांतील नागरिकांना होणार आहे. या स्थानकासाठी गोदावरी फाउंडेशनकडून रेल्वे प्रशासनाकडे यापूर्वीही पाठपुरावा करण्यात आला आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडून प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता तसेच स्थानक उभारणीसाठी पूर्वी २ कोटी १४ लाख रुपयांचे अंदाजपत्र तयार करण्यात आले. त्यापैकी १ कोटी २९ लाख रुपये गावकरी देण्यास तयार असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते.
चौकट
बहिणाबाईंचे नाव देशात जाणार
भुसावळ रेल्वे विभागासह लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन रेल्वे मंत्री आणि मध्य रेल्वेकडे प्रस्तावाचा पाठपुरावा करावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच प्रस्तावित स्थानकाला ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी’ यांचे नाव द्यावे, अशी मागणीही कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मारक समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी यांनी केली. यावेळी शरद नारखेडे, प्राचार्य माणिक पाटील, मनस्वी गोयल, शिवानी चव्हाण, शेख मोहम्मद अजिक, कुंदन अर्जुन पाटील, डॉ. हर्षल बोरोले, डॉ. गुणवंतराव सरोदे, अर्शन खान आदी उपस्थित होते.