NSK26H29073
टाळ-मृदंगाच्या गजरात रामवारी त्र्यंबकेश्वरी
पावसाच्या सरींतून भक्तांची पायी वाटचाल; हरिहर भेटीची पारंपरिक परंपरा जपली
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : टाळ-मृदंगाचा नाद, हरिनामाचा गजर आणि ‘श्रीराम जय राम जय जय राम’च्या अखंड घोषात पंचवटीतील काळाराम मंदिरातून निघालेली पारंपरिक रामवारी पायी दिंडी श्रावणातील चौथ्या सोमवारी भक्तिभावाने त्र्यंबकेश्वर येथे पोहोचली. पावसाच्या सरी आणि रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर मात करत शेकडो वारकऱ्यांनी श्रद्धेची ही वाट पूर्ण केली.
पंचवटीतील श्रीराम भक्त वारकरी ट्रस्ट आणि नाशिक वारकरी सांप्रदायिक यांच्या वतीने दरवर्षी रामवारी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. हरिहर भेटीच्या पारंपरिक संकल्पनेनुसार श्रीरामाची तुळस त्र्यंबकेश्वराला अर्पण केली जाते, तर त्र्यंबकेश्वराची बिल्वपत्रे श्रीरामाला वाहिली जातात. या अनोख्या धार्मिक परंपरेमुळे रामवारीला विशेष महत्त्व आहे.
त्र्यंबकेश्वर मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वारकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तरीही पावसाच्या सरींत ‘विठ्ठल रखुमाई’चा जयघोष करीत दिंडीने आपली वाटचाल सुरू ठेवली. मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी वारकऱ्यांचे स्वागत केले. महिला आणि पुरुष वारकरी अभंग-भजन गात, टाळ-मृदंगाच्या तालावर शिस्तबद्धपणे पुढे सरकत होते.
त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतल्यानंतर दिंडी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदिरात पोहोचली. तेथे भजन-कीर्तनाने वातावरण अधिक भक्तिमय झाले. त्र्यंबकेश्वराची बिल्वपत्रे श्रीरामाला अर्पण करून हरिहर भेटीच्या या पारंपरिक रामवारीचा भक्तिभावाने समारोप करण्यात आला.
दरम्यान, नाशिकमधून त्र्यंबकेश्वरकडे तीन ते चार रामवारी दिंड्या रवाना झाल्या असून, काळाराम मंदिरातून निघालेल्या दिंडीने या वारीचा प्रारंभ केला.