मृतांच्या वारसांना प्रत्येकी
सहा लाखांची भरपाई द्या
उपशीर्षक
नगरसेवक अरविंद देशमुख यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : पाळधी तरसोद बाह्यवळण मार्ग बंद झाल्यानंतर जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर अवजड वाहतुकीचा ताण वाढून झालेल्या प्राणांतिक अपघातांतील मृत नागरिकांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी किमान सहा लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष आणि जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त तथा नुकसानभरपाई निर्धारण समितीचे अध्यक्ष यांना निवेदन सादर केले आहे.
महानगरपालिकेने शहराची पालक व समन्वयक संस्था म्हणून पुढाकार घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून संयुक्त कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या मृतांच्या वारसांना हवी भरपाई
या अपघातांमध्ये मंगला अर्जुन माळी, प्रेमराज शिवराम चौधरी, योगेश ऊर्फ युवराज कडू महाजन, अनिरुद्ध सुरेश डहाके आणि शांताराम केशव पाटील यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीच्या आधारे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मृतांची नावे, पत्ते, कायदेशीर वारस, अपघातस्थळ आणि मृत्यूचे कारण पोलिस अभिलेख, घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल व वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या आधारे अधिकृतरीत्या निश्चित करण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे.
--------
(चौकट)
भरपाईसाठी या आदेशाचा आधार
निवेदनात मुंबई उच्च न्यायालयातील स्वयंस्फूर्त जनहित याचिका क्र. ७१/२०१३ मधील विविध आदेश, सार्वजनिक बांधकाम विभागाचा १९ नोव्हेंबर २०२५चा शासन निर्णय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित न्यायनिर्णयांचा संदर्भ देण्यात आला आहे. सुरक्षित व सुस्थितीतील रस्त्यांचा वापर हा नागरिकांच्या जीवनाच्या मूलभूत अधिकाराचा भाग असल्याचे देशमुख यांनी निवेदनात नमूद केले आहे.
------