लोगो : शालार्थ आयडी घोटाळा
---
शालार्थचा ‘मास्टर माइंड’ चव्हाणच!
साळुंकेला ९ पर्यंत कोठडी; एजंट प्रशांत वाडिलेचा पुन्हा घेणार ताबा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : राज्यभर गाजत असलेल्या सुमारे १६० कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड असलेला तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण याने एकेका शिक्षकाकडून बनावट शालार्थसाठी तब्बल किमान तीन लाखांची रक्कम उकळली असून, उत्तर महाराष्ट्रातील सुमारे सहाशे ते साडेसहाशे शिक्षकांना त्याने बनावट शालार्थ आयडी दिले. यातून त्याने तब्बल १८ ते २० कोटी रुपयांची कमाई केल्याची धक्कादायक माहिती आत्तापर्यंतच्या तपासातून समोर आली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात अटक करण्यात आलेला लॅब असिस्टंट तुषारकुमार साळुंके यांच्या पोलिस कोठडीत बुधवार (ता. ९)पर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर, दीपक गरुडच्या जामीन अर्जावरील सुनावणी शुक्रवार (ता. ११)पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा सहसचिव दीपक गरुड याच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारी (ता. ७) पार पडली. या वेळी गरुडच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला आहे. न्यायालयाने यासंदर्भात सरकार पक्षाचे म्हणणे मागविले आहे. त्यामुळे सदरची सुनावणी शुक्रवार (ता. ११)पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दीपक गरुड सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून, त्याचा आणखी मुक्काम वाढला आहे. वैद्यकीय कारणास्तव कारागृहातील दवाखान्यात सध्या तो उपचार घेत आहे.
तर, या घोटाळ्यात गेल्या आठवड्यात शिरपूरमधून अटक करण्यात आलेला संशयित तुषारकुमार साळुंके याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी (ता. ७) नाशिक रोड न्यायालयात नेले असता, नाशिक रोडचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एन. के. मेश्राम यांनी त्यास कोठडीत ९ तारखेपर्यंत तीन दिवसांची वाढ केली आहे. साळुंके याने प्रशांत वाडिले याच्याशी संगनमत करून बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून कोट्यवधींचा घोटाळा केला. वाडिले सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून, या गुन्ह्याचा तपास करणारे नाशिक शहर गुन्हे शाखेकडून चौकशीकामी त्याचा पुन्हा ताबा घेणार आहेत. यातून आणखी महत्त्वाचे धागेदोर तपास पथकाच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
चव्हाण रडारवर
दरम्यान, शालार्थ आयडी घोटाळ्याचा मास्टर माइंड तत्कालिन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण असून, उत्तर महाराष्ट्रातील सुमारे सहाशे ते साडेसहाशे शिक्षकांना त्याने बनावट शालार्थच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवून दिला आहे. मात्र त्यासाठी त्याने एका शालार्थसाठी किमान तीन लाख रुपये त्या-त्या शिक्षकांकडून वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर, यात तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रवीण आहिरे, मीनाक्षी गिरी यांचाही सहभाग निष्पन्न असल्याचे तपासातून सामेर आलेले आहे. सत्र न्यायालयाने या सर्वांचे जामीन अर्ज फेटाळले असून, जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गुन्हे शाखेच्या पथकांच्या रडारवर असलेले हे संशयित सध्या फरारी आहेत.
वाडिलेचा ताबा घेणार
याचप्रकरणी धुळ्यातून अटक करण्यात आलेला एजंट व शिक्षण संस्थाचालक प्रशांत वाडिले सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. तपासाच्या अनुषंगाने शहर गुन्हे शाखेकडून वाडिले यास पुन्हा ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी न्यायालयाकडे रीतसर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे. चौकशीतून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागणार आहे.