चार वर्षात एक लाख निरीक्षरांना अक्षर ओळख
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन : शिक्षणाविषयी जनजागृती करण्याचे प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.७ : शाळाबाह्य व्यक्तिंना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि निरक्षर व्यक्तिंना किमान आक्षर ओळख होण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेतून गेल्या चार वर्षात एक लाख व्यक्तिंना अक्षर ओळख मिळाल्याची माहिती योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी दिली.
दरवर्षी ८ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. २०११च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची एकूण साक्षरता ७४.३१ टक्के होती. महिलांच्या तुलनेत पुरुष साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्याने महिला साक्षरता वाढविणे, शाळाबाह्य व्यक्तींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे तसेच प्रौढांना मूलभूत शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.
तीन वर्षांत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (एफएलएनएटी) घेऊन असाक्षर व्यक्तींना साक्षरतेच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत १५ वर्षे व त्यावरील असाक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासोबतच मूलभूत साक्षरता, संख्याज्ञान, जीवनोपयोगी कौशल्ये, डिजिटल साक्षरता आणि आर्थिक साक्षरता याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. कुटुंबातील, नातेवाईकांमधील तसेच परिसरातील १५ वर्षांवरील असाक्षर व्यक्तींनी coschemenashik@gmail.com या ई-मेलवर किंवा शिक्षण विभागाने जारी केलेल्या क्यूआर कोडवर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
…
प्रत्येक असाक्षर व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा हा सामूहिक प्रयत्न असून, नागरिकांच्या सहभागातून नाशिक जिल्हा साक्षर व सक्षम करण्याचा संकल्प आपण पूर्ण करत आहोत.
-ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
….
वर्षनिहाय साक्षरतेचे प्रमाण
शैक्षणिक वर्ष.....उद्दिष्ट........प्रत्यक्ष प्रविष्ट
२०२३-२४....३२,७३६......२४,९८२
२०२४-२५.....२९,७२४.....२५,२१५
२०२५-२६.....३२,७३६.....३५,०७९
२०२६-२७.....६५,४७२...कार्यवाही सुरु