सटाणा ग्लेझ लेख दौलतराव गांगुर्डे

सटाणा ग्लेझ लेख दौलतराव गांगुर्डे
Published on
सटाणा वर्धापनदिन ------- फोटो ः दौलतराव गांगुर्डे ------- ४०-३ एका नकारातून उभा राहिला विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा वटवृक्ष ------------- १६-१ एखादा नकार मनाला वेदना देतो; मात्र त्याच वेदनेचे रूपांतर संकल्पात झाले, तर तो नकार अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो. बागलाणच्या मातीतून उभे राहिलेले शिक्षणप्रेमी डॉ. दौलतराव राघो गांगुर्डे यांच्या जीवनप्रवासाची कहाणी याच जिद्दीची आहे. - अंबादास देवरे, सटाणा -------------- वटार (ता. बागलाण) येथील कष्टकरी शेतकरी कुटुंबात १९६६ मध्ये डॉ. गांगुर्डे यांचा जन्म झाला. शेती अपुरी असल्याने वडिलांना शेतमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढावा लागत होता. सहा भाऊ आणि दोन बहिणी अशा मोठ्या कुटुंबातील धाकटे दौलतराव यांनी मात्र परिस्थितीपुढे हार मानली नाही. भावंडे शेतमजुरीत रमली असताना त्यांनी शिक्षणाची वाट धरली. वटारच्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर १९८२ मध्ये दहावी उत्तीर्ण झाले. पुढे नाशिकच्या के.टी.एच.एम. महाविद्यालयात अकरावी-बारावी आणि पंचवटी महाविद्यालयातून बी.एस्सी.ची पदवी घेतली. शिक्षणाची ओढ त्यांना मुंबईतील हाफकिन संस्थेपर्यंत घेऊन गेली. वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षण व नोकरीचा अनुभव मिळविला. काही कारणांमुळे नोकरी सोडल्यानंतर नाशिकमधील खासगी पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत काम केले. मात्र नोकरीत समाधान मानण्याऐवजी स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द त्यांच्या मनात होती. १९८९ मध्ये महाराष्ट्र बँकेकडून कर्ज घेत आईच्या नावाने सटाणा येथे ‘मोना क्लिनिकल पॅथॉलॉजी लॅब’ सुरू केली. आर्थिक अडचणींवर मात करत १९९५ मध्ये स्वतंत्र जागा घेत बागलाण तालुक्यातील पहिली संगणकीकृत पॅथॉलॉजी लॅब उभारली. एका नकाराने दिशा बदलली याच काळात त्यांच्या आयुष्याला आणि कार्याला निर्णायक वळण देणारा प्रसंग घडला. पत्नी अंजली गांगुर्डे यांनी बी.ए., बी.एड.पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विद्यार्थ्यांना घडविण्याची त्यांची इच्छा होती. वटार येथील विनाअनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षिकेची संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र डॉ. गांगुर्डे ज्या संस्थेच्या व्यवस्थापन समितीवर होते, त्याच संस्थेने त्यांच्या पत्नीला नोकरीची संधी नाकारली. हा नकार केवळ एका नोकरीचा नव्हता. त्यातून डॉ. गांगुर्डे यांच्या मनात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतःचे शैक्षणिक व्यासपीठ उभे करण्याचा विचार आकाराला आला. ‘आपल्याला संधी मिळाली नाही, तर इतर मुला-मुलींना संधी मिळण्यासाठी आपणच व्यासपीठ उभे करायचे,’ असा निर्धार त्यांनी केला. वैयक्तिक वेदनेला सामाजिक संकल्पाची जोड मिळाली आणि १९९९ मध्ये ‘मोना एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी’ची स्थापना झाली. छोट्या सुरुवातीचा विस्तार सुरुवातीला वैद्यकीय क्षेत्राशी निगडित अभ्यासक्रम, बालवाडी आणि विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना कौशल्याधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यानंतर २००४ मध्ये सटाणा शहरातील मित्रनगर परिसरात ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरू झाले. अवघ्या ५० विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या शाळेने काही वर्षांत ताहराबादकडे विस्तार केला. मुंजवाड येथेही संस्थेची शाखा सुरू झाली. कनिष्ठ महाविद्यालय, सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा आणि अंजली इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल अशा विविध शैक्षणिक शाखांमधून संस्थेचा विस्तार झाला. आज हजारो विद्यार्थी या शैक्षणिक प्रवाहाशी जोडले गेले आहेत. आधुनिक शिक्षणपद्धती, डिजिटल साधने आणि प्रयोगशील अध्यापनासोबत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच्या पलीकडील जगाशी जोडण्याचा प्रयत्न संस्थेकडून केला जातो. स्पर्धेच्या जगासाठी विद्यार्थ्यांची तयारी शिष्यवृत्ती, जवाहर नवोदय, विज्ञानविषयक स्पर्धा, सामान्य ज्ञान, ऑलिम्पियाड, सैनिकी परीक्षा, चित्रकला आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाते. इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट आणि सीईटीसारख्या स्पर्धात्मक परीक्षांचे मार्गदर्शन, तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर तास तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत विज्ञान पाया अभ्यासक्रम राबविला जातो. ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठ्या स्पर्धात्मक जगासाठी तयार करण्याच्या या प्रयत्नांचे प्रतिबिंब त्यांच्या यशातही दिसून येते. शिक्षणासोबत रुग्णसेवेचा वारसा डॉ. गांगुर्डे यांची वाटचाल केवळ शिक्षण क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. गांगुर्डे परिवाराने वैद्यकीय क्षेत्रातही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ज्येष्ठ पुत्र डॉ. भूषण गांगुर्डे आणि त्यांच्या पत्नी डॉ. तृप्ती गांगुर्डे यांनी सटाणा येथे अंजली हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णसेवेला सुरुवात केली. धाकटे पुत्र डॉ. अक्षय गांगुर्डे हे एम.बी.बी.एस., एम.डी. असून त्यांच्या पत्नी डॉ. समृद्धी गांगुर्डे दंतचिकित्सक आहेत. कष्टकरी शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका मुलाने स्वतःच्या शिक्षणासाठी परिस्थितीशी केलेली झुंज पुढे असंख्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आधार बनली. पत्नीला नोकरी नाकारली गेल्याची खंत त्यांनी वैयक्तिक दुःख न बनविता सामाजिक संकल्पात रूपांतरित केली. त्यामुळे डॉ. दौलतराव गांगुर्डे यांची कहाणी केवळ एका शिक्षणसंस्थेच्या विस्ताराची नाही; ती एका नकाराचे संधीत, संघर्षाचे चळवळीत आणि एका स्वप्नाचे हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यामध्ये रूपांतर करणाऱ्या जिद्दीची कहाणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com