आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी कालमर्यादा निश्चित करावी. तसेच केंद्र आणि राज्य सरकारने आवश्यक समन्वय साधून कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासह विविध मागण्यांसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समाजातर्फे सोमवारी (ता.७) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
धनगर समाजातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावा. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव द्यावे. चर्चगेट स्थानकाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण करावे. संत बाळूमामा देवस्थानच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी पूर्ण करावी. तसेच देवस्थानच्या आर्थिक व्यवहारांचे विशेष फॉरेन्सिक ऑडिट करावे. संत बाळूमामा आणि अहिल्यामाता देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करावा आदी मागण्या करण्यात आल्या.
श्री करवीर निवासिनी अंबामाता महालक्ष्मी देवस्थान, पंढरपूर व शिर्डी देवस्थानांसाठी स्वतंत्र, सक्षम आणि पारदर्शक देवस्थान कायद्याची निर्मिती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही समाजातर्फे देेण्यात आला. आंदोलनात धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.