NSK26H29072
जळगाव : विविध योजनांच्या प्रलंबित देयकांच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना देताना कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी.
मूलभूत सुविधांसह विविध
योजनांची देयके प्रलंबित
कंत्राटदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : जिल्हा परिषद व पंचायत समितीअंतर्गत २५१५ मूलभूत सुविधा, ग्रामविकास, जलजीवन मिशन व इतर विविध विकास योजनांची कोट्यवधी रुपयांची देयके गेल्या अडीच ते ३ वर्षांपासून प्रलंबित असल्याने जिल्ह्यातील कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या प्रलंबित देयकांमुळेच राज्यात ६ कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देण्यात आले.
कंत्राटदारांनी स्वतःच्या खिशातून, कर्ज काढून, व्याजाने पैसे आणून शासनाची विकासकामे पूर्ण केली आहेत, मात्र ३ वर्ष झाली तरी देयके मिळत नसल्याने कंत्राटदार आर्थिक संकटात सापडला आहे. बँकेचे हप्ते, कामगारांचे पगार, पुरवठादारांची देणे थकल्याने कंत्राटदार हतबल झाला आहे.
या प्रसंगी जळगाव येथील कंत्राटदार सुरज नारखेडे, कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष शरद आबा, संजय आफरे, शांताराम दादा पाटील, राजेश शिरसाठ, अनंता पाटील, राकेश चव्हाण, निलेश रमेश पाटील यांसह असंख्य कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
कार्यवाही न झाल्यास आंदोलन
शासनाने २५१५, मूलभूत सुविधा, जलजीवन मिशन व ग्रामविकासच्या सर्व प्रलंबित देयकांचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ८ दिवसांत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.