नंदराज देवरे : शिक्षक ते संघटक;

नंदराज देवरे : शिक्षक ते संघटक;
Published on
नंदराज देवरे NSK26H29079 ----------------- शिक्षक ते संघटक ः कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे व्यक्तिमत्त्व ------------------- शिक्षकी पेशातील अभ्यासू वृत्ती, विद्यार्थ्यांशी असलेली नाळ, संघटन कौशल्य आणि सामाजिक प्रश्नांबाबतची संवेदनशीलता यांच्या जोरावर आपल्या कार्यकर्तृत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून नंदराज रामचंद्र देवरे यांचे नाव बागलाणच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात घेतले जाते. ----------------- राष्ट्रवादी काँग्रेस बागलाण तालुका माध्यमिक शिक्षक सेलचे अध्यक्ष म्हणून नंदराज देवरे यांच्यावर नवी जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांच्या दीर्घ सामाजिक व संघटनात्मक वाटचालीला या माध्यमातून नवे व्यासपीठ मिळाले आहे. निताणे (ता. बागलाण) येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या देवरे यांनी सटाणा महाविद्यालयातून १९८५ मध्ये विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर बी.एड.चे शिक्षण पूर्ण केले. १९८७ मध्ये महाराष्ट्र विद्या प्रसारक समाज संस्थेच्या तिळवण येथील माध्यमिक विद्यालयात उपशिक्षक म्हणून त्यांनी सेवेला प्रारंभ केला. विज्ञान व गणित विषयाचे प्रभावी अध्यापन करताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रियता मिळविली. सलग १४ वर्षांच्या अध्यापन सेवेनंतर सेवाज्येष्ठतेनुसार त्यांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती झाली. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक संघाने त्यांच्यावर जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. त्यानंतर बागलाण तालुका मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघटनात्मक पातळीवर सक्रिय राहताना त्यांनी प्रशासनाशी समन्वय साधत अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. मुख्याध्यापक म्हणून आखतवाडे येथे कार्यरत असताना शाळेच्या इमारतीचा प्रश्न त्यांनी पुढाकाराने मार्गी लावला. तत्कालीन पोलिस अधिकारी प्रतापराव दिघावकर यांच्या सहकार्याने तसेच खासदार दारासिंग यांच्या स्थानिक विकास निधीतून विद्यालयासाठी सुसज्ज इमारत उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना स्वाभिमान पुरस्कार, गिरणा गौरव पुरस्कार आणि रोटरी गौरव पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. शिक्षकी सेवेत असतानाही गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, गरजेनुसार आर्थिक मदत करणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग राहिला. सार्वजनिक प्रश्नांबाबतही त्यांनी सातत्याने भूमिका घेतली. रस्ता रोको, उपोषण, आंदोलने तसेच गांधीगिरीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या माध्यमातून पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय झाल्यानंतर देवरे यांनी पक्षाच्या विविध उपक्रमांत सहभाग घेतला. पक्षाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. विविध पदांवर काम करताना निर्माण झालेला जनसंपर्क आणि संघटन कौशल्य यामुळे पक्षाने त्यांच्यावर सातत्याने जबाबदाऱ्या सोपविल्या. शिक्षक, मुख्याध्यापक, संघटक आणि सामाजिक कार्यकर्ता अशा विविध भूमिकांतून चार दशकांहून अधिक काळ कार्यरत राहिलेल्या नंदराज देवरे यांच्या कार्याची हीच वाटचाल आता राष्ट्रवादी काँग्रेस बागलाण तालुका माध्यमिक शिक्षक सेलच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून पुढे सुरू राहणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव आणि संघटनात्मक कौशल्याच्या बळावर ही जबाबदारी ते प्रभावीपणे पार पाडतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com