लोगो :
जागतिक फिजिओथेरेपी दिन
‘फिजिओथेरेपी’ देतेय जगण्याला गती..!
आधुनिक वैद्यकशास्त्रात फिजिओथेरेपीचा वाढता प्रभाव
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : आधुनिक वैद्यकीय शास्त्रात औषधोपचार आणि शस्त्रक्रिया जेवढ्या महत्त्वाच्या मानल्या जातात, तेवढाच अविभाज्य भाग आता फिजिओथेरेपी (भौतिकोपचार) बनली आहे. पूर्वी केवळ हाडे मोडणे किंवा स्नायूंच्या दुखण्यापुरते मर्यादित मानले जाणारे हे शास्त्र आज अतिदक्षता विभागापासून ते वृद्धापकाळातील हालचाली सुलभ करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर रुग्णांचे जीवन पूर्ववत करण्यासाठी व सामान्यांच्या जगण्याला गती देण्याचे काम करीत आहे.
अपघातातील दुखापत, स्नायूंशी निगडित शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा आजार बरा झाल्यावर त्याला स्वतःच्या पायावर उभे करणे, त्याच्या दैनंदिन हालचाली पूर्ववत करणे आणि त्याला स्वावलंबी जीवन मिळवून देण्यात फिजिओथेरेपिस्टची भूमिका अत्यंत निर्णायक ठरते. फ्रॅक्चरनंतरची जडणघडण, मणक्याचे आजार (स्लिप डिस्क, सायटिका), मान व पाठदुखी, फ्रोजन शोल्डर, सांधेदुखी तसेच गुडघा किंवा खुबा बदलण्याच्या शस्त्रक्रियेनंतर हालचाली सुरळीत करण्यासाठी फिजिओथेरेपी महत्त्वाची ठरते. पक्षाघात, अर्धांगवायूचा झटका आलेले रुग्ण, पार्किंन्सन्स, सेरेब्रल पाल्सी, मणक्याच्या मज्जारज्जूला झालेली दुखापत, चेहऱ्याचा पक्षाघात यांसारख्या आजारांमध्ये स्नायूंची ताकद परत मिळविण्यासाठी हे शास्त्र प्रभावी ठरत आहे. बायपास शस्त्रक्रियेनंतर, अस्थमा, ब्राँकायटिस, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज असलेल्या रुग्णांची श्वसनक्षमता वाढविण्यासाठी प्रभावी ठरत आहे. व्हेंटिलेटरवर दीर्घकाळ असलेल्या रुग्णांना व्हेंटिलेटरवरून यशस्वीरीत्या बाहेर काढणे, छातीतील कफ बाहेर काढणे आणि दीर्घकाळ अंथरुणावर झोपल्याने स्नायू आखडणे टाळण्यासाठी हे शास्त्र उपयुक्त ठरते आहे.
खेळाडूंचे स्नायू ताणले जाणे, लिगामेंटला झालेली दुखापत, खांद्याच्या दुखापती आणि खेळाडूंची तंदुरुस्ती पूर्ववत करून त्यांना पुन्हा मैदानात उतरविण्यासाठी या शास्त्राचा आधार घेतला जात आहे. गरोदरपणातील कंबरदुखी, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर पेल्व्हिक फ्लोअर स्नायूंची मजबुती, तसेच सिझेरियननंतरच्या पुनर्वसनासाठीही डॉक्टर फिजिओथेरेपीचे सत्र करण्याचा सल्ला देत आहेत.
इन्फो
नाशिकमध्ये शिक्षणसंधी...
फिजिओथेरेपी तज्ज्ञ होण्यासाठी वैद्यकीय शाखेतील किमान पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक असते. सद्यःस्थितीत पदव्युत्तर अभ्यासक्रमातून स्पेशलायझेशनची संधी उपलब्ध आहे. नाशिकच्या विद्यार्थ्यांना येथेच शिक्षण संधी उपलब्ध आहे. नाशिकमध्ये ‘मविप्र’ संस्थेचे फिजिओथेरेपी महाविद्यालय असून, पदवीसाठी ४०, पदव्युत्तरसाठी २४ प्रवेश क्षमता आहे. एसएमबीटी फिजिओथेरेपी महाविद्यालयात १००, मोतीवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरेपीमध्ये ५०, सर डॉ. एम. एस. गोसावी कॉलेज ऑफ फिजिओथेरेपीमध्ये ४० जागा आहेत. नाशिक कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी ६०, साई केअर कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी ६० जागा उपलब्ध आहेत. याशिवाय, सिन्नर व सटाणा अशा ग्रामीण भागातही महाविद्यालय कार्यरत आहे.
चौकट
आज जागतिक फिजिओथेरेपी दिन...
जगभरात ८ सप्टेंबर हा दिवस जागतिक फिजिओथेरेपी दिन म्हणून साजरा केला जातो. ८ सप्टेंबर १९५१ ला जागतिक पातळीवर फिजिओथेरेपी तज्ज्ञांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘वर्ल्ड कन्फेडरेशन फॉर फिजिकल थेरपी’ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ १९९६ पासून दरवर्षी ८ सप्टेंबर हा दिवस जगभरात ‘जागतिक फिजिओथेरेपी दिन’ म्हणून साजरा केला जातो.
---------
H29074
कोट
आधुनिक वैद्यकशास्त्र लोकांचे प्राण वाचविण्यात कमालीचे यशस्वी ठरले आहे; परंतु त्या वाचलेल्या जीवाला पुन्हा जगण्याचा आनंद आणि गती मिळवून देण्याचे काम फिजिओथेरेपी हे शास्त्र करीत असल्याचे दोन दशकांच्या अनुभवातून लक्षात आले. आयुष्यातील विविध टप्प्यांवर उद्भवणाऱ्या व्याधींमध्ये फिजिओथेरेपिस्टचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. म्हणून अनेक युवक या क्षेत्रात उज्ज्वल करिअर करीत आहेत.
- डॉ. अम्रित कौर, प्राचार्या,
‘मविप्र’चे फिजिओथेरेपी महाविद्यालय