टुडे १, मेन
----
NSK26H29076
जळगाव : अजिंठा चौकातील बसथांब्याजवळ लागलेली वाहने.
-----
शहरातील महामार्गाच्या पुनर्बांधणीत अतिक्रमणाचा खोडा
उपशीर्षक
समांतर रस्ते अडवले; कंत्राटदार एजन्सीचे मनपा आयुक्त, महापौरांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.७ : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणासह पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. मात्र, महामार्गालगतचे, मार्गावरील चौकांमधील आणि समांतर रस्त्यांवरील अतिक्रमण आता या पुनर्बांधणीच्या कामात मोठा अडथळा ठरत असून त्या पार्श्वभूमीवर कंत्राटदाराने महापालिका आयुक्तांसह महापौरांना हे अतिक्रमण हटविण्याबाबत साकडे घातले आहे. या महामार्गालगत व समांतर रस्त्यांवरील अतिक्रमणाचे १४ ठिकाणच्या ‘हॉटस्पॉट’ची छायाचित्रेही जोडली आहेत. पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करत हे अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या पुनर्बांधणीचे काम सध्या सुरू आहे. नंदुरबारच्या ड्रीम कन्स्ट्रक्शनने हे काम घेतले असून या कामास कालिंका माता मंदिर चौकापासून सुरवात करण्यात आली. शहरातील चौपदरी महामार्गाचे स्क्रॅपिंग करुन त्यावर व्हाईट टॉपिंग (कॉंक्रिटीकरण)सह सेवा रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण यात अंतभूत आहेे. त्यासाठी कामाच्या ठिकाणी वाहतूक सुरक्षितपणे वळविण्यासाठी समांतर रस्ते उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
१४-१
अशा आहेत अडचणी
मात्र, शहरातील विविध भागांतील समांतर रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. या कामाच्या ठिकाणी मुख्य मार्गावरील वाहतूक सुरू ठेवताना वाहनांची गर्दी, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अशावेळी उपलब्ध समांतर रस्त्यांचा वापर करून वाहतूक वळविणे आवश्यक आहे. मात्र, अतिक्रमणांमुळे हे रस्ते पूर्ण क्षमतेने वापरता येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
१४-१
याठिकाणी अडथळा
खोटे नगर ते मानराज पार्क परिसर तसेच खोटेनगरच्या उजव्या बाजूकडील समांतर रस्ता, इच्छादेवी चौक परिसर, अजिंठा चौक व परिसरातील समांतर रस्त्यांसह शहरातील इतर ठिकाणीही समांतर रस्त्यांवर अतिक्रमणे किंवा अनधिकृत अडथळे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या सर्व ठिकाणांची पाहणी करून अतिक्रमणे हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.
१४-१
संयुक्त कार्यवाहीची गरज
समांतर रस्ते अतिक्रमणमुक्त झाल्यास महामार्ग पुनर्बांधणी कामाच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार वाहतूक सुरक्षितपणे वळविता येईल. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच वाहनचालक, पादचारी, कामगार आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही कार्यवाही महत्त्वाची असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
------
(चौकट)
अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संबंधित ठिकाणांची तातडीने पाहणी करून रस्त्यावरील अडथळे दूर करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. आवश्यक असल्यास महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, वाहतूक शाखा आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी करून कार्यवाही करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. अतिक्रमणांची सद्य:स्थिती दर्शविणारी १४ ठिकाणच्या अतिक्रमणांची छायाचित्रेही निवेदनासोबत जोडण्यात आली आहेत.
----------