धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त
--
जामचा मळा भागात
गुंगीच्या गोळ्यांचे सेवन
धुळे : शहरातील जामचा मळा परिसरात गुंगीकारक औषधी गोळ्यांचे सेवन करणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता. ६) सायंकाळी पकडले. शंभरफुटी रोड परिसरात सायंकाळी सातच्या सुमारास शाहरुख अब्बास खाटीक (वय ३०, रा. चाळीसगाव रोड, धुळे) हा सार्वजनिक ठिकाणी गुंगीकारक औषधी गोळ्यांचे सेवन केलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या ताब्यातील ५४ रुपये किमतीच्या गोळ्यांचे एक पाकीट जप्त करण्यात आले. त्यातील १५ पैकी नऊ गोळ्या शिल्लक होत्या. याप्रकरणी हवालदार विवेक वाघमोडे यांच्या फिर्यादीनुसार चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
-
प्रेमाच्या संबंधातून
तरुणीला धमकी
धुळे : प्रेमसंबंधातून तरुणीवर अत्याचार करून तिच्याकडून ५५ हजार रुपये घेतल्याचा तसेच आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत तरुणी आणि तिच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शिंदखेडा येथे समोर आला. याप्रकरणी हर्षदीप योगराज परदेशी आणि त्याच्या पत्नीविरूध्द (दोघे रा. शिंदखेडा) शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पीडित तरुणीच्या फिर्यादीनुसार हर्षदीप याने तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात वेळोवेळी पैशांची मागणी करून ५५ हजार रुपये घेतले. तिचे आणि त्याचे फोटो व व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. फोटो व व्हिडिओ स्टोरीद्वारे प्रसारित करून बदनामी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
-
धुळे कारागृहातील
बंदीवानाचा मृत्यू
धुळे : जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बंदी रोहीत रामनिवास यादव (वय ३५) याचा छातीत तीव्र वेदना झाल्याने रुग्णालयात नेत असताना रविवारी (ता. ६) पहाटे मृत्यू झाला. यादव हा नवा तुरुंग विभागातील बॅरक क्रमांक चारमध्ये होता. पहाटे साडेचारच्या सुमारास त्याच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. कारागृह कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहित मोरे यांना पाचारण केले. प्राथमिक तपासणीनंतर यादव याला १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. भैरव वडजे यांनी सकाळी सव्वासहाच्या सुमारास तपासून मृत घोषित केले. याबाबत धुळे शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
-