धुळे ः टुडे १ साठी
--
फोटो क्रमांक ः 29085
धुळे : धनगर समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी संदीप पाटील यांना देताना मोर्चेकरी.
--
धनगर आरक्षणासाठी आक्रोश मोर्चा
-
संघटीत समाजाचे धुळ्यातून मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ७ : धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजातर्फे शहरात मंगळवारी (ता. ७) आक्रोश मोर्चा काढण्यात आला. संतोषीमाता चौकातून निघालेल्या या मोर्चानंतर क्युमाईन क्लबजवळ निदर्शने करण्यात आली. नंतर शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. ते अपर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारले.
धनगर समाजाच्या निवेदनात म्हटले आहे, की आरक्षणाचा प्रश्न अनेक दशकांपासून प्रलंबित असून, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. आगामी सुनावणीत राज्य सरकारने आरक्षणाच्या समर्थनार्थ आपली ठाम व स्पष्ट भूमिका मांडावी, अशी आग्रही मागणी आहे. तसेच न्यायालयीन निर्णय प्रतिकूल झाल्यास राज्य सरकारने पर्यायी ‘प्लॅन-बी’ तयार ठेवावा, केंद्र व राज्य सरकारने समन्वय साधून निश्चित कालमर्यादेत अंमलबजावणी करावी.
प्रमुख मागण्यांमध्ये मुंबई-बंगळुरू महामार्गावरील कनेक्टिंग लिंकला हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देणे, चर्चगेट रेल्वे स्थानकाला राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणे, संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या गैरव्यवहाराची ‘एसआयटी’ चौकशी पूर्ण करणे आणि अंबामाता देवस्थानच्या धर्तीवर स्वतंत्र कायदा करावा आदी विषयांचा समावेश आहे. शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समाजातर्फे देण्यात आला आहे. आंदोलनात डॉ. प्रकाश मोरे, अमोल मासुळे, सुनील वाघ, गोपाल माने, पंडित मदने, सोपान पाटील, कल्पेश सरग, भगवान गर्दे, लखन ठेलारी, योगेश ठेलारी, युवराज हटकर, भूषण पाटील, राजेंद्र चांडे, किशोर सरगर, युवराज सूर्यवंशी, पांडुरंग थोरात, रवींद्र गर्दे, प्रकाश मासुळे, मोतीराम पाटील, आबा पाटील, वाल्मीक धनगर, रवींद्र पाटील, एकनाथ पाटील, प्रकाश खरात, छोटू थोरात, अशोक सूर्यवंशी, सत्तू गलांडे आदी सहभागी झाले.