H29087
नाशिक : आगामी परिषदेविषयक माहिती देताना डॉ. देवदत्त चाफेकर. शेजारी डावीकडून डॉ. कैलास शेवाळे, डॉ. नागेश अघोर, डॉ. मोहन पटेल.
---
मूत्रपिंड विकारतज्ज्ञांची शुक्रवारपासून परिषद
देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग, ‘३६० डिग्री किडनी केअर’ चा देणार संदेश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी (आयएसएन) पश्चिम विभाग आणि नेफ्रॉलॉजी फोरम ऑफ नाशिक यांच्यातर्फे मूत्रपिंड विकारतज्ज्ञांची ४२ वी परिषद आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार (ता. ११) ते रविवार (ता. १३) दरम्यान मुंबई नाका परिसरातील हॉटेल फोर पॉइंट्स बाय शेराटन आणि हॉटेल ट्रीट येथे परिषद होणार असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. देवदत्त चाफेकर यांनी दिली.
हॉटेल ट्रीट येथे सोमवारी (ता. ७) झालेल्या पत्रकार परिषदेस आयोजन समितीचे सचिव डॉ. नागेश अघोर, खजिनदार डॉ. मोहन पटेल आणि शास्त्रोक्त समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास शेवाळे उपस्थित होते.
डॉ. चाफेकर म्हणाले, की आधुनिक काळानुसार मूत्रपिंडाच्या आजारांवरील औषधोपचारात प्रभावी पर्याय उपलब्ध झाले आहेत. यासंदर्भात विविध वैज्ञानिक सत्रे, संशोधन सादरीकरणे आणि कार्यशाळांमधून तज्ज्ञांना माहिती दिली जाईल. आजारांचे प्रतिबंध, वेळेवर निदान, आधुनिक उपचार, डायलिसिस, प्रत्यारोपण, संशोधन आणि जनजागृतीवर विशेष भर दिला जाणार आहे. गुणवत्तापूर्ण डायलिसिससंदर्भात शासनाला प्रस्तावही दिला जाणार आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील ३५० हून अधिक मूत्रपिंड विकारतज्ज्ञ सहभागी होणार असून, दोनशेहून अधिक जागतिक स्तरावरील वक्ते मार्गदर्शन करतील.
डॉ. अघोर यांनी सांगितले, की मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, वाढते वजन आणि बदलती जीवनशैली यांचा मूत्रपिंडाच्या आरोग्यावर परिणाम होतो. अनेकदा सुरुवातीला कोणतीही ठळक लक्षणे दिसत नसल्याने नागरिकांमध्ये जागरूकता आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ‘३६० डिग्री किडनी केअर’चा संदेश परिषदेत दिला जाणार आहे.
‘सायलेंट हॉल’मध्ये प्रबंधांचे सादरीकरण
डॉ. कैलास शेवाळे म्हणाले, की अकरा वर्षांनंतर नाशिकला या परिषदेच्या आयोजनाचा बहुमान मिळाला आहे. परिषदेत ‘सायलेंट हॉल’ साकारण्यात येणार असून, एकाच वेळी दोन स्क्रीनवर सादरीकरणे होतील. सहभागी मायक्रोफोनद्वारे आवडीचे सत्र ऐकू शकतील. शोधप्रबंध सादरीकरणाची संधीही उपलब्ध राहील.
परिषदेतून पर्यावरणाला साथ
परिषदेत छापील कार्यक्रमपत्रिका किंवा पुस्तिका दिली जाणार नाही. सर्व माहिती क्यूआर कोडद्वारे उपलब्ध असेल. प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांऐवजी पुनर्वापराच्या बाटल्या व वॉटर रिफिल स्टेशन्सचा वापर केला जाईल. पुष्पगुच्छांऐवजी रोपटी, सीड बॉल्स किंवा पर्यावरणपूरक भेटवस्तू दिल्या जातील. स्थानिक व हंगामी मराठमोळ्या पदार्थांचा मेनू ठेवून अन्नाची नासाडी टाळण्याचाही पुढाकार घेतला जाणार आहे.