सीटीबी : डॉ. जितेंद्र डोलारे
फोटो - १ - 15823
डॉ. जितेंद्र डोलारे यांचे कुटुंबीय.
---
फोटो - २ - 15824
उल्लेखनीय कार्याबद्दल तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व गोपालदासजी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना डॉ. जितेंद्र डोलारे.
---
फोटो - ३ - 15825
कोरोनाकाळात केलेल्या उल्लेखनीय कामामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना डॉ. जितेंद्र डोलारे यांचे कुटुंबीय.
---
फोटो - ४ - 15826
डॉ. जितेंद्र डोलारे
---
संघर्षातून घडलेला आरोग्यसेवेचा ‘देवदूत’
केशेगावच्या जिल्हा परिषद शाळेपासून दुर्गम, नक्षलग्रस्त भागापर्यंत डॉ. जितेंद्र डोलारे यांचा प्रेरणादायी प्रवास
---
लीड
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मेहनत करण्याची तयारी, शिक्षणाची ओढ आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द असेल, तर सामान्य कुटुंबातील मुलगाही असामान्य उंची गाठू शकतो. ही उक्ती आपल्या जीवनातून सिद्ध करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. जितेंद्र रावसाहेब डोलारे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या या डॉक्टरांनी आर्थिक संघर्ष, वैयक्तिक दुःख आणि दुर्गम भागातील आव्हानांवर मात करत वैद्यकीय क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
वैद्यकीयतज्ज्ञ, कुशल प्रशासकीय अधिकारी आणि समाजाभिमुख आरोग्यसेवक अशी त्यांची बहुआयामी ओळख आहे. दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील रुग्णांसाठी त्यांनी केलेली सेवा असो किंवा कोरोनाकाळात दाखविलेला सेवाभाव डॉ. डोलारे यांच्या कार्याचा केंद्रबिंदू कायम एकच राहिला आहे, तो म्हणजे रुग्णसेवा.
आईच्या त्यागातून घडलेले व्यक्तिमत्त्व
धाराशिव जिल्ह्यातील केशेगाव या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात डॉ. डोलारे यांचा जन्म झाला. त्यांची आई सीताबाई रावसाहेब डोलारे अशिक्षित होत्या; मात्र शिक्षणाचे महत्त्व त्यांनी आपल्या आयुष्यातून अनुभवले होते. संसारातील काटकसर, कष्ट आणि त्याग करत त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्याचा ध्यास घेतला.
वडिलांच्या साथीने त्यांनी जितेंद्र, हनुमंत, पांडुरंग आणि आशा या चारही मुलांना प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण दिले. आई-वडिलांनी दिलेली कष्टाची शिकवण, प्रामाणिकपणा आणि शिक्षणाविषयीची जिद्द हीच डॉ. डोलारे यांच्या यशाची खरी पायाभरणी ठरली.
जिल्हा परिषद शाळा ते एमबीबीएसचा प्रवास
डॉ. डोलारे यांचे प्राथमिक शिक्षण केशेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील गौडगाव येथील बोर्डिंग शाळेत त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. मात्र शिक्षणाचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता.
दहावी ते बारावीच्या काळात कुटुंबावर आर्थिक संकट आले. अशा परिस्थितीत स्वतःच्या शिक्षणासाठी आणि उदरनिर्वाहासाठी त्यांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणूनही काम केले. मात्र परिस्थितीला दोष न देता त्यांनी काम आणि शिक्षण यांची सांगड घातली. बारावीनंतर धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून त्यांनी पहिल्याच प्रयत्नात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे एमबीबीएससाठी प्रवेश मिळविला.
---
चौकट
संघर्षाचा पहिला धडा
हातात पुस्तक आणि मनात डॉक्टर होण्याचे स्वप्न... आर्थिक परिस्थितीमुळे हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करतानाही डॉ. डोलारे यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही.
आईची छाया हरपली; पण ध्येय कायम राहिले
एमबीबीएसच्या अंतिम वर्षात असतानाच आई सीताबाई यांच्या निधनाने त्यांच्या आयुष्यात मोठा आघात झाला. ज्या आईने आयुष्यभर कष्ट करून मुलांना शिकविले, तिची छाया अचानक डोक्यावरून निघून जाणे हा अत्यंत वेदनादायी क्षण होता. मात्र बंधू हनुमंत आणि पांडुरंग यांनी दिलेला मानसिक आधार आणि स्वतःची प्रबळ इच्छाशक्ती यांच्या बळावर त्यांनी या दुःखावर मात केली. नैराश्याला शरण न जाता त्यांनी एमबीबीएस पूर्ण केले आणि पुढील शिक्षणाचा निर्धार कायम ठेवला.
नीट-पीजी परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे एमडी (प्रीव्हेंटिव्ह ॲन्ड सोशल मेडिसीन पूर्ण केले. समाजातील सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, ही भावना त्यांच्या कार्यामागे अधिक दृढ झाली.
दुर्गम भागातून राज्यस्तरीय जबाबदाऱ्यांपर्यंत
डॉ. डोलारे यांच्या कारकिर्दीची सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील अतिदुर्गम प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून झाली. ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्यसेवेतील प्रत्यक्ष अडचणी त्यांनी जवळून अनुभवल्या. त्यानंतर राज्य आरोग्य सेवा संचालनालयात राज्यस्तरीय अधिकारी, तसेच सहायक संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण घेत त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील विविध आरोग्य कार्यक्रमांमध्ये योगदान दिले.
राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील राज्यस्तरीय मुख्य प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. नागपूर येथे लिम्फॅटिक फिलेरियाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. तत्कालीन आरोग्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना आरोग्य प्रशासनाचा व्यापक अनुभव त्यांना मिळाला.
नक्षलग्रस्त गडचिरोलीत सेवाभावाची खरी परीक्षा
पदोन्नतीनंतर त्यांची नियुक्ती नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा निवासी आरोग्य अधिकारी म्हणून झाली. या भागातील भौगोलिक परिस्थिती, आरोग्य सुविधांची मर्यादा आणि दुर्गम वस्तीतील नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले.
अहेरी येथे महिला व बाल रुग्णालयाशी संबंधित कार्यक्रमाच्या नियोजनातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कठीण परिस्थितीतही आरोग्यसेवा हा केवळ व्यवसाय नसून सामाजिक जबाबदारी आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले.
कोविडकाळातील ‘देवदूत’ सेवा
डॉ. डोलारे यांच्या जीवनातील सर्वाधिक भावनिक आणि समाजाभिमुख अध्याय म्हणजे कोविडचा काळ. आपल्या जन्मभूमी केशेगाव आणि परिसरातील नागरिकांसाठी त्यांनी भीतीच्या वातावरणातही विनामूल्य वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. रुग्णांना योग्य मार्गदर्शन, वेळेवर उपचार आणि धीर देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. या सेवाभावाची दखल घेत त्यांना ‘देवदूत’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे, तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला.
मालेगावच्या आरोग्यव्यवस्थेला नवी दिशा
सध्या मालेगावच्या आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी डॉ. डोलारे सांभाळत आहेत. मालेगाव महापालिका येथे वैद्यकीय आरोग्य अधिकारी (वर्ग-१), सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तसेच महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून ते कार्यरत आहेत.
शहरातील विविध शासकीय आणि निमशासकीय आरोग्य संस्थांमध्ये समन्वय साधत नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि संवेदनशील आरोग्यसेवा देण्यावर त्यांचा भर आहे. मालेगाव महापालिकेच्या क्षयरोग विभागाला महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळवून देण्यातही त्यांच्या नेतृत्वाचा उल्लेखनीय वाटा आहे.
आरोग्य सेवेपलीकडे समाजप्रबोधन
डॉ. डोलारे यांचे कार्य केवळ रुग्णालयाच्या चार भिंतींपुरते मर्यादित नाही. निष्काम सेवाभाव, अध्यात्म, अंधश्रद्धा निर्मूलन, अवयवदान, सर्वधर्मसमभाव आणि आरोग्यविषयक जनजागृती या विषयांवर त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर समाजप्रबोधन केले आहे. वैद्यकीय ज्ञान आणि आध्यात्मिक विचार यांचा सुंदर समन्वय साधत त्यांनी समाजजागृतीचा वेगळा मार्ग निवडला. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ‘वरद सन्मान पुरस्काराने’ गौरविण्यात आले.
यशाच्या प्रवासात जीवनसाथीची खंबीर साथ
डॉ. डोलारे यांच्या यशामागे पत्नी श्रद्धा डोलारे यांचेही मोलाचे योगदान आहे. मिरज येथे एमडीचे शिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली आणि १५ मे २०१३ मध्ये त्यांचा विवाह झाला. जीवनातील अनेक चढ-उतार, जबाबदाऱ्या आणि भावनिक संघर्षांच्या काळात श्रद्धा डोलारे यांनी त्यांना खंबीर मानसिक व कौटुंबिक आधार दिला. या दांपत्याला शार्दुल आणि जिया ही दोन मुले आहेत.
संघर्षातून घडलेला खरा ‘देवदूत’
केशेगावच्या जिल्हा परिषद शाळेपासून सुरू झालेला हा प्रवास हॉटेलमधील वेटरच्या नोकरीतून पुढे गेला; एमबीबीएस, एमडी, दुर्गम भागातील आरोग्यसेवा, राज्यस्तरीय प्रशासन, नक्षलग्रस्त गडचिरोलीतील आव्हाने आणि आज मालेगावच्या आरोग्य व्यवस्थेतील नेतृत्वापर्यंत पोहोचला.
डॉ. जितेंद्र डोलारे यांची कहाणी ही केवळ एका डॉक्टरच्या यशाची कहाणी नाही. ती एका अशिक्षित आईच्या त्यागाची, शेतकरी कुटुंबाच्या संस्कारांची आणि संकटांवर मात करणाऱ्या जिद्दीची कहाणी आहे.
---
कोट
परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येय सोडू नका. शिक्षण, प्रामाणिक मेहनत आणि समाजासाठी काहीतरी करण्याची भावना असेल, तर संघर्ष हाच यशाचा सर्वांत मोठा मार्ग ठरतो. डॉक्टर होणे म्हणजे केवळ उपचार करणे नव्हे; तर संकटाच्या काळात रुग्णाच्या मनात विश्वास निर्माण करणे हीसुद्धा तितकीच मोठी जबाबदारी आहे. परिस्थितीपेक्षा आपले ध्येय मोठे असावे; कारण जिद्द असेल, तर सामान्य माणूसही असामान्य इतिहास घडवू शकतो.
- डॉ. जितेंद्र डोलारे