NSK26H29062
जळगाव : रोटरीत नवीन सदस्यांच्या स्वागत सोहळ्यात सदस्यांसह माजी प्रांतपाल मोहन पालेशा, योगेश राका, बिपिन काबरा, विनोद बियाणी.
---------
आनंदी राहण्यासाठी इतरांना आनंदी करा
--
माजी प्रांतपाल मोहन पालेशा : रोटरीतर्फे नवीन सदस्यांचे स्वागत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : आपल्याला आनंदी राहायचे असेल, तर इतरांना आनंदी करता आले पाहिजे. आपल्या जवळील सुख थोडं इतरांना देता आले पाहिजे. मनात संवेदना जागृत असेल, तरच ते शक्य आहे, असे मत वक्ते व माजी प्रांतपाल मोहन पालेशा (पुणे) यांनी व्यक्त केले.
येथील मायादेवी नगरातील रोटरी भवनात नुकत्याच झालेल्या रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे नवीन सदस्य स्वागत सोहळा व क्लबला मिळालेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट अवॉर्डच्या जल्लोष कार्यक्रमात श्री. पालेशा बोलत होते. अध्यक्ष योगेश राका, मानद सचिव बिपिन काबरा, मेंबरशिप डेव्हलपमेंट कमिटीचेअरमन विनोद बियाणी उपस्थित होते.
श्री. पालेशा यांनी सांगितले की, गरजा मर्यादित आहेत, पण अपेक्षा प्रचंड आहेत. भौतिक सुख वस्तूंचा अभ्यास माणसाला लागला आहे. असा कोणता प्रपंच वाढला आहे की आपल्याला आई-वडिलांची सेवा किंवा सांभाळ करता येत नाही, असा मार्मिक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नवीन सदस्यांनी संपूर्ण परिवारासह रोटरी कार्यात स्नेह, प्रेम, जिव्हाळा व माणुसकीच्या माध्यमातून सहभागी होऊन रडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करावे.
यावेळी डॉ. आनंद काबरा, राजीव धांडे, रौनक बियाणी, आश्विन जयस्वाल, दिलीप मंधान, डॉ. केदार थेपडे, शालिग्राम मराठे, डॉ. शुभदा पाटील, निकिता अग्रवाल, नुरुद्दीन राजकोटवाला यांना सदस्यत्व देऊन परिवारासह सन्मानित करण्यात आले. रोटरी जळगाव वेस्टला २०२५-२६ या रोटरी वर्षात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मिळालेल्या २३ डिस्ट्रिक्ट अवॉर्ड व गव्हर्नर कप याबद्दल अध्यक्ष गौरव सफळे, प्रशासन सचिव महेश सोनी, प्रकल्प सचिव देवेश कोठारी यांचा मोहन पालेशा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.