फोटो : H29150
नाशिक : आयआयए नाशिक सेंटरची नूतन कार्यकारणी.
---------------
‘आयआयए’ नाशिकच्या
अध्यक्षपदी अमोल चौधरी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स (आयआयए), नाशिक सेंटरची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत अमोल चौधरी यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली आहे. नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी स्मिता कासार, सचिवपदी रोहिणी मराठे आणि खजिनदारपदी निखिल पाळेकर यांची निवड झाली आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून विजय पवार, सुरुची पाटील, शहानवाज मणियार, मैत्रेय कुटे आणि विवेक विभूते यांची निवड झाली आहे. आयआयए ही ११० वर्षे जुनी संस्था असून देशभर संस्थेच्या शाखा आहे. चौधरी यांना आर्किटेक्चर क्षेत्रातील २१ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, या अनुभवाचा उपयोग नाशिक सेंटरच्या आगामी कार्यकाळात सकारात्मक आणि परिणामकारक कामासाठी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. आर्किटेक्चर क्षेत्र सध्या मोठ्या स्थित्यंतरातून जात असून, आगामी काळात या क्षेत्रासमोर अनेक नवी आव्हाने आणि संधी आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुयोग्य आणि प्रभावी वापर, महापालिका व इतर शासकीय यंत्रणांशी संबंधित दैनंदिन अडचणी, बदलते शासकीय नियम व धोरणे, बांधकाम क्षेत्रातील नवनवीन उत्पादने व तंत्रज्ञान, तसेच आर्किटेक्ट्स ॲक्टमधील प्रस्तावित बदल व त्या बदलांच्या अनुषंगाने आर्किटेक्ट तसेच आर्किटेक्चरबद्दल जागरूकता वाढवणे, अशा विविध विषयांवर नव्या कार्यकारिणीमार्फत काम केले जाणार आहे. या सर्व विषयांवर सेंटरच्या सभासदांशी संवाद साधून, त्यांची मते व सूचना जाणून घेत सर्वसमावेशक आणि सर्वानुमते निर्णय घेण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे चौधरी यांनी सांगितले. संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी इंदोर येथील जितेंद्र मेहता यांची तर महाराष्ट्र अध्यक्षपदी छत्रपती संभाजीनगर येथील सुनील भाले व कार्यकारिणी सदस्यपदी नाशिकचे योगेश महाजन यांची निवड झाली. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल कारखानीस यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.