टुडे एक
NSK26H29155
जळगाव : जिल्हाभरात भंगार गुदामांची पाहणी करताना पोलिस.
---
‘श्रीं’च्या स्थापनेपूर्वीच पोलिसदलाचे ‘वॉश आऊट’
जळगाव जिल्ह्यात एकाच वेळेस कोम्बिंग; भंगार दुकाने, गुन्हेगारांची झाडाझडती
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : मालमत्ताविषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासह अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात एकाचवेळी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सराईत आरोपी, वाहने व भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. कारवाईत ३६ अवैध धंदेचालकांवर कारवाई करून सुमारे १० लाख ६० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
जिल्हा पोलिस दलातर्फे (ता. ७) संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी प्रतिबंधात्मक ऑपरेशन राबविण्यात आले. ही मोहीम पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यामध्ये प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करण्यात आली. तसेच संशयास्पद वाहनांसह भंगार दुकानांची तपासणी करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली.
अवैध धंद्यांविरुद्ध प्रभावी कारवाई करीत दारुबंदी, एनडीपीएस, आर्म्स ॲक्ट व अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या मोहिमेत १५७ भंगारच्या दुकाने, २८१ रेकॉर्डवरील आरोपी, ७४२ संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. तर ५ जणांविरुद्ध मुंबई पोलिस अधिनियमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करुन २३ जणांना एनबीडब्ल्यू वॉरंटची बजावणी करण्यात आली.
चौकट
दारू विक्रेत्यांवर कारवाई
जिल्हाभरात ३६ अवैधरित्या गावठी व देशी-विदेशी दारू विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यात ७३८ लिटर गावठी दारू, ६१३० लिटर कच्चे रसायन तर १६४ देशी-विदेशी व बियर बाटल्या असा एकूण ४ लाख ७८ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच कोयता घेऊन फिरणाऱ्यासह वाळू वाहतूक करणाऱ्या डंपवर कारवाई करून १० लाख रुपयांचे डंपर आणि १५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली.