फोटो : H29177
वर्धा : अधिरा आहेर, केशिका पुरकर व प्रशिक्षक पुनीत देसाई
केशिकाला दोन पदके,
अधिरा आहेरला कांस्य
महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : नुकत्याच वर्धा येथे झालेल्या चौथ्या महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या केशिका पुरकरने १३ वर्षाखालील मुलींच्या गटाचे सुवर्ण तर १५ वर्षाखालील मुलींच्या गटाचे रौप्य पदक पटकावले. याच स्पर्धेत ११ वर्षाखालील मुलींच्या गटात नवोदित खेळाडू अधिरा आहेरने कांस्य पदक मिळवले.
वर्धा येथे झालेल्या स्पर्धेत नाशिकच्या महिला खेळाडूंनी पाच विविध वयोगटात व पुरुष गटामध्ये अशा एकूण सहा गटात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यामध्ये नाशिकच्या टेबल टेनिसपटूंनी तीन सुवर्ण व तीन रौप्यपदके मिळवली.
१३ वर्षाखालील मुलींच्या एकेरीत नाशिकच्या केशिका पुरकरने अंतिम फेरीत टीएसटीटीए मुंबईच्या वेदिका जयस्वालचा ३-१ ने पराभव करत विजेतेपद पटकावत सुवर्णपदक जिंकले. १५ वर्षाखालील मुलींच्या गटात केशिकाला अंतिम फेरीत परभणीच्या आद्या बाहेतीकडून ३-० ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ११ वर्षाखालील मुलींच्या गटात नाशिकच्या उदयोन्मुख टेबल टेनिसपटू अधिरा आहेरने कांस्य पदक पटकावले. उपांत्य फेरीत ठाण्याच्या कायरा लेलेशी झालेल्या चुरशीच्या सामन्यात अधिरा आहेरचा २-३ पराभव केल्यामुळे अधिराला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. खेळाडूंच्या यशाबद्दल नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी, उपाध्यक्ष राजेश भरवीरकर व मिलिंद कचोळे, कोषाध्यक्ष अभिषेक छाजेड आदींनी अभिनंदन केले.