गणेशोत्सवाचे दहा दिवस आंदोलनाला विराम द्या!
पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आवाहन; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : गणेशोत्सव हा सर्वांसाठी श्रद्धेचा आणि उत्साहाचा सण आहे. हा सण शांततेत व मोठ्या उत्साहात साजरा होत असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मराठा, ओबीसी, आदिवासी तसेच एमपीएससीच्या मुंबईतील सर्व आंदोलकांनी गणेशोत्सवाचे दहा दिवस आंदोलनाला विराम द्यावा. त्यानंतर आंदोलने करावीत, असे आवाहन नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी (ता.९) केले.
नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात बोलताना मंत्री महाजन म्हणाले, की सरकारची भूमिका लवचिक असून सरकारने आंदोलकांच्या तब्बल १४ मागण्या यापूर्वीच मान्य केल्या आहेत. त्यामुळे ‘सर्व मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सोडणार नाही,’ अशी ताठर भूमिका घेणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाल्यास कायदा व सुव्यवस्थेसह अनेक गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे सर्वांनी संयमाची भूमिका घेत उत्सव शांततेत पार पडू द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, नाशिक शहर हरित करण्यासाठी दर रविवारी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत असल्याची माहितीही महाजन यांनी दिली. संपूर्ण शहरात तब्बल पाच लाख वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला असून, नागरिकांसह विविध सामाजिक संस्थांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आगामी कुंभमेळा हा सर्वांचा असल्याने त्यापूर्वी नाशिक शहर अधिक सुंदर, स्वच्छ आणि हरित करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
राउतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मनोज जरांगे यांच्या जिवाला धोका असल्याचा केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया देताना मंत्री महाजन यांनी राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांच्या वक्तव्याला कोणताही लगाम राहिलेला नाही. ते काहीही आरोप करू शकतात. यापूर्वी तुरुंगात असताना विष दिल्याचाही आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांच्या अशा बेछूट वक्तव्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, असे महाजन म्हणाले.
परिस्थिती गंभीर झाली तर ‘कोरडा दुष्काळ’
राज्यातील पावसाच्या स्थितीबाबत बोलताना मंत्री महाजन म्हणाले, की विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पुरेशा पावसाअभावी पिके करपू लागली आहेत. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास संकट अधिक गंभीर होऊ शकते. गरज पडल्यास कोरडा दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासन विचार करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कृत्रिम पावसाचे यापूर्वीचे प्रयोग अपेक्षेइतके यशस्वी ठरलेले नाहीत. चीनमध्ये काही ठिकाणी असे प्रयोग यशस्वी झाल्याचे सांगितले जात असले, तरी त्याचे संभाव्य दुष्परिणामही तपासावे लागतील, असे महाजन यांनी नमूद केले. दरम्यान, नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.