‘एमपीएससी’चा कारभार पारदर्शक करावा

‘एमपीएससी’चा कारभार पारदर्शक करावा
Published on
‘एमपीएससी’चा कारभार पारदर्शक करा स्पर्धा परीक्षार्थींचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीचे पडसाद बुधवारी (ता. ९) नाशिकमध्ये उमटले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे थांबविताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) कारभार पारदर्शक करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. एमपीएससी परीक्षेतील कथित गैरप्रकार, पेपरफुटीचे आरोप व निकालातील संशयास्पद गुण तफावतीविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यापुढे विद्यार्थ्यांनी तक्रारींचा पाढा वाचताना १८ कलमी मागण्यांचे निवेदन दिले. एमपीएससी परीक्षेमधील पारदर्शकता व गोपनीयता रसातळाला गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. राज्यसेवा मुख्य परीक्षा- २०२५ च्या निकालातील गुण तफावतीचा मुद्दाही जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला. भूगोल विषयाच्या एका पेपरमध्ये १२९ गुण, तर दुसऱ्या पेपरमध्ये अवघे दोन गुण; काही उमेदवारांना एका पेपरमध्ये ११६, तर दुसऱ्यात १४ गुण मिळाल्याचे दाखले देताना मूल्यांकन प्रक्रियेवर विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वषार्नुवर्षे अभ्यास करून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सहन केला जाणार नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका निर्मितीपासून वितरणापर्यंत कडक भौतिक व सायबर सुरक्षाव्यवस्था निर्माण करावी. मूल्यांकन, तसेच मॉडरेशनची पारदर्शक पद्धत जाहीर करण्यात यावी. सरकार आणि एमपीएससीने मागण्यांची तातडीने दखल घेत ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन राज्यभरात तीव्र छेडण्यात येईल, असा इशारा विद्यार्थी प्रतिनिधींनी दिला. --- प्रमुख मागण्या - पेपरफुटी, अन्य गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करावी - आयोगातील वरिष्ठांना चौकशी प्रक्रियेपासून दूर ठेवावे - संशयास्पद गुणतफावतींची पुनर्तपासणी करण्यात यावी - तक्रारींसाठी स्वतंत्र ऑनलाइन निवारण यंत्रणा उभारावी - परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही, आधुनिक सुरक्षा पुरवावी - गैरप्रकार उघड करणाऱ्या विद्यार्थ्यांना संरक्षण मिळावे - संयुक्त परीक्षा सुधारणा समितीची स्थापन करावी घोषणांनी परिसर दणाणला नाशिकमध्ये स्पर्धा परीक्षार्थींच्या संतापाचा उद्रेक होऊन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मुख्य प्रवेशद्वारावर तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले. या वेळी ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे बंद करा, मागण्यांकडे गांभीर्याने पाहत त्या सोडवाव्या, एमपीएससीचा कारभार पारदर्शक करावर यांसह विविध घोषणा दिल्या. या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
Marathi News Esakal
www.esakal.com