चार महिलांसह युवती शहरातून बेपत्ता
ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल; पोलिसांकडून शोध सुरू
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : शहर परिसरातून तीन विवाहितांसह दोन युवती बेपत्ता झाल्याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. सिडकोतील २८ वर्षीय तरुणी नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेरील परिसरातून अचानक बेपत्ता झाली आहे. १ सप्टेंबरला सकाळी ही घटना घडली. तिचे भाऊजी यांच्या फिर्यादीनुसार, तरुणीला अज्ञाताने पळवून नेले आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार देवरे तपास करत आहेत.
पंचवटी परिसरातील विवाहिता संशयास्पदरीत्या बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी तिच्या सासूने दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहिता सोमवारी (ता. ७) दुपारी किराणा दुकानात जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र, ती रात्री उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. नातेवाइकांनी तिचा शोध घेतला असता, ती आढळून आली नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केले असावे, असा संशय तिची सासू यांनी व्यक्त केला आहे. हवालदार मंगेश जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तिसऱ्या घटनेत आडगाव परिसरातील नवविवाहिता बेपत्ता झाली आहे. पतीच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. ८) दुपारी फोन करून डोके दुखत असल्याचे सांगितले व मेडिकलमधून औषध आणण्यासाठी जात असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर ती घरी परतलीच नाही. तिचा मोबाईल नंबरवर संपर्क होऊ शकला नाही व परिसरात शोध घेऊनही ती सापडली नाही. अज्ञात इसमाने तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत पतीने आडगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. हवालदार देवरे पुढील तपास करीत आहेत. चौथ्या घटनेत मांडसांगवी येथून तरुणी बेपत्ता झाली आहे. तक्रारदार आईच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. ७) रात्री तरुणी घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली. शोध घेऊनही तिचा पत्ता न लागल्याने अपहरण केल्याची खात्री झाली. याप्रकरणी आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार राजोळे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
--
युवतीचे अपहरण
सातपूर कॉलनीतून एक मुलगी बेपत्ता झाली आहे. सोमवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास ती राहत्या घरातून निघून गेली ती परत आलीच नाही. अज्ञाताने आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार बी. एस. सूर्यवंशी या प्रकरणाचा तपास करत आहेत.