मेन फिचर
NSK26H29202 / NSK26H29203
जळगाव : आक्रोश करताना कुटुंबीय व नातेवाईक.
---
NSK26H29201 : करण सोनवणे
----
सुसाट कंटेनर अंगावर उलटला; तरुणाचा मृत्यू
पाळधी-तरसोद बायपासवरील घटना; कुटुंबीयांचा प्रचंड आक्रोश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : पाळधी-तरसोद बाह्यवळण मार्गावर (बायपास) सुसाट कंटेनरचा ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात करण जनार्धन सोनवणे (वय २२, रा. दोनगाव, ता. धरणगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कंटेनरखाली पूर्णपणे दबलेल्या करणला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी धाव घेतली; मात्र, अपघाताची भीषणता पाहता त्यांना केवळ हतबलपणे पाहत राहावे लागले.
घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, करण सोनवणे तरुण दुचाकीने पाळधी बायपासवरील टाहाकळी फाट्याजवळ आला होता. त्याने दुचाकी एका बाजूला लावली, अन् तो मोबाईलवर बोलत उभा होता. इतक्यात बायपासवरून सुसाट वेगातील अनियंत्रित कंटेनर आला आणि करणच्या अंगावरच उलटला. अंगावर कोसळल्याने अजस्त्र वजनी कंटेनर उलटल्याने तो त्याखाली दबला गेला. अपघाताची माहिती कळताच ग्रामस्थांनी मदतीला धाव घेतली.
प्रयत्नाअंती काढले बाहेर
अजस्त्र कंटेनर खाली अडकलेल्या करणला पाऊण तासांच्या प्रयत्नांनी बाहेर काढून तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. अपघाताची माहिती कळताच करणच्या कुटुंबीयांसह दोनगाव ग्रामस्थ नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मात्र, करणचा मृत्यू झाल्याचे कळताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडत आक्रोश केला.
चौकट
कंत्राटदारावर गुन्हा दाखल होऊनही
अपघाताच्या ठिकाणी बायपासच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, या कामाबाबत वाहनचालकांना पूर्वसूचना देणारे आवश्यक सूचना फलक या मार्गावर लावण्यात आले नसल्यानेच हा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यावर सुरू असलेल्या कामाची माहिती वाहनचालकांना वेळीच न कळल्याने त्याचा अतीवेगवान कंटेनरवरील ताबा सुटला आणि तो, घरंगळत जावून उलटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी माहिती देतांना सांगितले. अवघ्या आठ दिवसांपूर्वीच झालेल्या अपघातप्रकरणी कंत्राटदाराविरुद्ध दुरुस्तीचे काम करत असताना निष्काळजी केल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असताना कंत्राटदाराकडून कुठल्याही उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाहीत. संबंधित कंत्राटदारावर पुन्हा दुसरा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.
वाहतूक विस्कळीत
अपघातानंतर बायपासवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्ग पोलिसही घटनास्थळी धडकले. दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबल्याने पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.