धुळे : टुडे पान ३ साठी...
--
फोटो क्रमांक : 29206
साक्री : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करावी या मागणीचे निवेदन नायब तहसीलदारांना देताना कावठे व पेरेजपूर येथील शेतकरी.
--
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या
--
कावठे, पेरेजपूरच्या बाधित शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. ९ : मार्च महिन्यात झालेल्या भीषण गारपीट व अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या कावठे व पेरेजपूर येथील उर्वरित शेतकऱ्यांना शासकीय मदत तातडीने मिळावी या मागणीसाठी बुधवारी (ता. ९) दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी साक्रीच्या तहसीलदारांना निवेदन दिले.
रब्बी हंगामात गारपीट व अवकाळी पावसाने सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. घटनेनंतर महसूल विभाग व कृषी विभागाच्या पथकासह जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीचे सविस्तर पंचनामे केले होते. पंचनाम्यानंतर सुमारे एका महिन्यापूर्वी शासनाकडून अनुदान वाटप सुरू झाले. मात्र कावठे व पेरेजपूर या दोन्ही गावांतील केवळ निम्म्याच शेतकऱ्यांना अनुदान मिळाले असून, उर्वरित नुकसानग्रस्त शेतकरी आजही या मदतीपासून वंचित आहेत. बाधित शेतकरी अनुदानाबाबत महसूल विभाग, तहसील कार्यालय व स्थानिक तलाठ्यांकडे वारंवार चौकशी करत आहेत. परंतु, ‘मिळेल’ याशिवाय कोणतेही ठोस उत्तर त्यांना मिळत नाही. सध्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी हाताशी असलेला सर्व पैसा खर्च करून पेरणी केली आहे. परंतु, पावसाने ताण दिल्यामुळे आता खरीप पिकेही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील थकीत अनुदान तात्काळ मिळणे अत्यंत गरजेचे झाले आहे. निवेदन स्वीकारताना नायब तहसीलदारांनी हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवून लवकरात लवकर अनुदान वितरित केले जाईल, अशी ग्वाही दिली. या वेळी कावठे व पेरेजपूर येथील शेतकरी उपस्थित होते.