(आवश्यक)
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळात फूट नाही
(उपशीर्षक)
मुकुंद मेटकर यांचा दावा; सेवेसाठी वर्षभर २४ तास राहणार उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळामध्ये फूट पडल्याचे चुकीचे चित्र निर्माण केले जात आहे. परंतु, अशा प्रकारची कोणतीही फूट पडली नसून गणेशोत्सवातील दहा दिवसांसह वर्षभर २४ तास आम्ही सेवेसाठी उपलब्ध राहणर असल्याचा दावा डॉ. अविनाश आचार्य प्रणित सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मुकुंद मेटकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
डॉ. अविनाशदादा आचार्य प्रणित सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची आज (ता. ९) पद्मावती मंगल कार्यालयात बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रपरिषदेला योगिदत्तनाथ महाराज, दीपक जोशी, अमित भाटिया, बंटी नेरपगारे आदी उपस्थित होते. मेटकर यांनी सांगितले, की महामंडळात वर्षांनुवर्षे अनेक कार्यकर्ते सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत. असे असताना काही लोकांकडून चुकीच्या पद्धतीने फूट पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. महामंडळाचे अध्यक्ष उपलब्ध होत नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या आग्रहाखातर रविवारी (ता.६) बैठक बोलावत लोकनियुक्त अध्यक्ष व सचिव निवड झाली होती. या बैठकीला ५३ मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु ३० वर्षानंतर देखील अध्यक्ष राहावे हे मान्य नाही. गणेशोत्सवाच्या दहा दिवस काम व अकराव्या दिवशी पुण्याला जाणार हे मान्य नसल्याचे देखील मेटकर यांनी सांगितले.
चौकट
अध्यक्षपदासाठी तटस्थ भूमिका
यंदाच्या गणेशोत्सवात महामंडळ म्हणून सर्व गणेश मंडळांशी संपर्क राहील. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महामंडळ तत्पर राहील व कायम बांधिल राहील. पदासाठी हिंदू बांधव व मंडळांमध्ये वाद नको म्हणून यंदा तटस्थ भूमिका राहणार असल्याचे मेटकर यांनी स्पष्ट केले. गेल्या अनेक वर्षांपासून एकच व्यक्ती प्रमुख पदावर होती, ज्याला कोणी विरोध केला नाही. मात्र, नवीन नेतृत्वालाही संधी मिळाली पाहिजे ही सर्व मंडळांची भावना होती. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सदस्य मुकुंद मेटकर यांची अध्यक्षपदी तर दीपक जोशी यांची कार्याध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आल्याचे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले.