(जागेनुसार वापरावी)
बांभोरी प्र.चा. ग्रामपंचायत
दप्तराची होणार सखोल चौकशी
(उपशीर्षक)
अनियमितता आढळल्याने सीईओंचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : ग्रामपंचायतीच्या दप्तराची तपासणी करताना प्रथमदर्शनी कामे व नोंदीमध्ये काही अनियमितता आढळून आली. याबाबत बांभोरी प्र.चा. ग्रामपंचायतीच्या दप्तराची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी (आज. ९) धरणगाव तालुक्यातील बांभोरी प्र.चा. येथील ग्रामपंचायतीस अचानक भेट देऊन विविध कामांची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, धरणगावचे गटविकास अधिकारी सागर कोल्हे उपस्थित होते.
श्रीमती नायर या धरणगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी बांभोरी प्र.चा. ग्रामपंचायतीस भेट दिली. त्यांनी ग्रामपंचायतीच्या विविध अभिलेख व दप्तरांची तपासणी केली. तपासणीदरम्यान प्रथमदर्शनी काही बाबींमध्ये अनियमितता निदर्शनास आल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती तपासण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
शाळेला भेत देत सुविधांची पाहणी
दौऱ्यादरम्यान नायर यांनी बांभोरी येथील जिल्हा परिषद शाळेलाही भेट दिली. यावेळी शाळेतील स्वच्छता, परिसराची देखभाल तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या शैक्षणिक सुविधांची पाहणी केली. तसेच घनकचरा व्यवस्थापनाबाबत सूचना दिल्या.