जिल्ह्यात दहा शेतकऱ्यांनी संपविले जीवन

जिल्ह्यात दहा शेतकऱ्यांनी संपविले जीवन
Published on
अस्मानीसुलतानी संकटात बळीराजा हरला जिल्ह्यात आठ महिन्यांत १० शेतकऱ्यांची आत्महत्या सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : अस्मानी आणि सुल्तानी संकटांच्या कात्रीत सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक विवंचनेचे संकट अधिक गडद होत असल्याचे चित्र आहे. यंदाच्या वर्षातील जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत जिल्ह्यात दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यापैकी तब्बल आठ घटनांमध्ये कर्जबाजारीपण हे प्रमुख कारण असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या नोंदीतून समोर आली आहे. विशेष म्हणजे, एकट्या बागलाण तालुक्यात निम्म्या म्हणजे पाच घटना घडल्या आहेत. दुष्काळ, अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि हवामानातील सातत्याने होणारे बदल यामुळे मागील काही वर्षांपासून शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. नैसर्गिक आपत्तींचा फटका पिकांना बसत असतानाच, कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला बाजारपेठेत अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटत आहे. उत्पादन खर्च वाढत असताना उत्पन्नात मात्र अपेक्षित वाढ होत नसल्याने अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले जात आहेत. या परिस्थितीत कर्जाची परतफेड आणि वसुलीचा तगादा शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर घालत असल्याचे चित्र आहे. आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्याने काही शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्टअखेर दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी एका शेतकऱ्याच्या आत्महत्येमागे नापिकी, तर एका प्रकरणात वैयक्तिक कारण असल्याची नोंद आहे. उर्वरित आठ घटनांमध्ये कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी जीवन संपविल्याची माहिती प्रशासनाच्या नोंदीतून पुढे आली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय निकषांनुसार एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत आठ प्रकरणांत ही मदत मंजूर केली आहे. उर्वरित दोन प्रकरणांपैकी एक प्रकरण प्रलंबित असून, दुसरे प्रकरण शासकीय निकषात बसत नसल्याने त्यातील मदत नाकारण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यांना आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी महसूल प्रशासनाकडून विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. कृषी विभागासह संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून गरजू शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यावर भर दिला जात असल्याचे प्रशासनाने सांगितले. आत्महत्यांच्या नोंदी बागलाण : ०५ कळवण : ०२ नाशिक : ०१ देवळा : ०१ पेठ : ०१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com